मुंबई : बाहुबली 2 सध्या सर्व विक्रम मोडत असतानाच मराठी सिनेविश्वातून एक जबरदस्त बातमी आली आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी आपल्या ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत असल्याचं आपण ऐकल्याचं म्हटलं आहे. या सिनेमाचं बजेट 225 कोटींहून जास्त असल्याचंही राम गोपाल वर्मांनी लिहिलंय. आपल्या ट्विटमध्ये रितेशचं कौतुकही त्यांनी केलं आहे.

दरम्यान गेले 2 आठवडे बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या बाहुबली 2 चं बजेट तब्बल 500 कोटी होतं. मात्र मराठीत 250 कोटी बजेट असणारा शिवाजी हा पहिलाच सिनेमा आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवी जाधव याचं दिग्दर्शन करणार आहेत.

https://twitter.com/RGVzoomin/status/862517589158670336

शिवाजी महाराजांची कहाणी बाहुबलीपेक्षा सरस आणि वास्तववादी आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांना वेगळाच आनंद देईल. शिवाजी महाराज भारताचे शूरवीर सुपुत्र आहेत, ज्यांनी परकीय आक्रमणं परतवून लावत स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांच्या कहाणीमध्ये बाहुबलीपेक्षाही सांगण्यासारख्या खूप गोष्टी असून ती सत्यकथा आहे. त्यामुळे तो एक जबरदस्त अनुभव असेल असंही रामगोपाल वर्मांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/862518377411039232

त्यामुळे रितेशच्या सिनेमातील युद्धाचे सीन खूप भव्यदिव्य असतील यात काही शंकाच नाही, असं राम गोपाल वर्मांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/862519017508032512

शिवाजी महाराजांवरील भव्यदिव्य सिनेमा बनवणाऱ्या रितेश देशमुखचे राम गोपाल वर्मांनी ट्विटरवरुन आभारही मानले आहेत.

https://twitter.com/RGVzoomin/status/862520508272660480

शिवाजी महाराजांवरील या सिनेमामुळे महाराष्ट्राला अभिमान वाटेल, जो सध्या बाहुबली 2 मुळे आंध्रप्रदेशमधील लोकांना वाटतो, असंही वर्मा पुढे म्हणाले आहेत.