मुंबई : महाराष्ट्रातला सत्तापेच आता जवळपास सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे आज शिवतीर्थावर (दादर येथील शिवाजी पार्क) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरत पाहायला मिळत आहे.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्यामुळे बॉलवूड अभिनेत्री राखी सावंत हिलादेखील आनंद झाला आहे. तिने तिचा आनंद इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंतने दावा केला आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर दहशतवाद रोखतील.

राखीने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा आहे आणि तेच मुख्यमंत्री होतील, असा अंदाज मी यापूर्वीच व्यक्त केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर मराठी माणसासाठी ती चांगली बाब असेल. केवळ मराठीच नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर जाती-धर्माच्या लोकांसाठीदेखील ते चांगलंच असेल.

या व्हिडीओमध्ये राखीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. ती म्हणाली की, पवारांनी त्यांच्या पक्षातील काही लोकांना हाकललं ते चांगलं केलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मिळून सरकार स्थापन करत आहेत याचा खूप आनंद झाला आहे.

उद्धव ठाकरेंबद्दल राखी म्हणाली की, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र आहेत. त्यांच्या डीएनएमध्ये राजकारण आहे. ते ज्यावेळी सरकार स्थापन करतील तेव्हा दहशतवाद संपवतील.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करुन भाजपशी हातमिळवणी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सोबत नेले. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्तास्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

परंतु, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीनच दिवसात अजित पवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि स्वगृही परतले आहेत. अजित पवारांनी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे ते सरकार पडलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी राज्यात सत्तास्थापन करणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात अजित पवारांना संधी मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

पाहा काय म्हणाली राखी?


शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना फोनवरुन निमंत्रण | ABP Majha