Rakesh Jhunjhunwala :  शेअर बाजारातील बिग बुल असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Bollywood Connection) यांचा 'मिडास टच' बॉलिवूड चित्रपटांनाही लागला. राकेश झुनझुनवाला यांनी तीन बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती (Rakesh Jhunjhunwala Produce Movie) केली. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. राकेश झुनझुनवाला हे हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. 


राकेश झुनझुनवाला यांनी वर्ष 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून पदार्पण केले. गौरी शिंदे दिग्दर्शित 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटाची निर्मिती झुनझुनवाला यांनी केली होती. या चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवी हिने दीर्घकाळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. चित्रपटाचा आशय, कलाकारांचा दमदार अभिनय आणि गौरी शिंदेचे दिग्दर्शन यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला. 


'इंग्लिश विंग्लीश' चित्रपटाशिवाय राकेश झुनझुनवाला यांनी आणखी दोन चित्रपटांची निर्मिती केली होती. यामध्ये 'शमिताभ' आणि 'की अॅण्ड का' या चित्रपटाचा समावेश आहे. शमिताभ या चित्रपटात अमिताभ बच्चन, धनुष आणि अक्षरा हसन यांची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने फार मोठी कमाई केली नसली तरी समीक्षकांनी, प्रेक्षकांनी याचे कौतुक केले होते. तर, 'की अॅण्ड का' चित्रपटात अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांची जोडी झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश  कमावले. 


राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. 


राकेश झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवास हा एखाद्या दंतकथेप्रमाणे भासावा असा राहिला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात केली होती. जुलै 2022 अखेरीस त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी होते. 


शेअर बाजारातील 'बेअर ते बुल'


राकेश झुनझुनवाला हे सुरुवातीला 'बेअर' होते. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा करणाऱ्यांना 'बेअर' म्हटले जाते. तर, खरेदी करणाऱ्यांना बुल म्हटले जाते. हर्षद मेहता घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून मोठा नफा कमावला. त्यानंतर झुनझुनवाला हे 'बेअर'च्या ऐवजी 'बुल' झाले असल्याचे म्हटले जाते.


राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा यादेखील गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावाने Rare Enterprises ही ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.
राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते. 


राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी होती.  झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते. 'स्टार हेल्थ'मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.  फोर्टीस हेल्थकेयरमध्ये 4.23 टक्के, कॅनरा बँकेत 1.96 टक्के आणि क्रिसीलमध्ये 2.92 टक्के इतकी त्यांची भागीदारी होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या: