नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून 'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेने अखेर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या निमंत्रणानंतर सिनेमा पाहण्याचा निर्णय घेतला आहे. करणी सेनेच्या लोकेंद्र कलवी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यानंतर भन्साळींचं निमंत्रण स्वीकारत असल्याची माहिती दिली.


योगी आदित्यनाथ यांच्याकडे सिनेमावरील बंदीच्या मागणीचं समर्थन करण्याची मागणी केली असल्याचं लोकेंद्र कलवी यांनी सांगितलं. पत्रकार परिषद घेऊन भेटीबद्दल सविस्तर माहिती देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संजय लीला भन्साळी यांनी करणी सेनेला पद्मावत सिनेमा पाहून नंतर भूमिका ठरवण्याचं आवाहन केलं होतं.

योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट झाल्यानंतर कलवी आश्वस्त आहेत. सिनेमाच्या विरोधात ज्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता, त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे, असं कलवी म्हणाले. शिवाय ते आमच्या मागण्यांचं समर्थन करतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टाने हा सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सिनेमावर बंदीची मागणी करण्यात आली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा मोठ्या विरोधानंतर 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे. मात्र करणी सेनेचा देशभर सिनेमाला तीव्र विरोध सुरुच आहे. यासाठी आंदोलनही केलं जात आहे.