मुंबई : मनोरंजन विश्वातला अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. याच ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारतातर्फे मराठमोळ्या दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हा सिनेमा सहभागी झाला आहे.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने आज याची घोषणा केली. 26 चित्रपटांमधून 'न्यूटन'ला ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजकुमार राव या सिनेमात मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.

राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमारशिवाय पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्याही मुख्य भूमिका आहे.

हा सिनेमा आज देशभरातील 350 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाल्याने राजकुमार रावनेही आनंद व्यक्त केला आहे.

या चित्रपटांचं आव्हान
ऑस्करमध्ये परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत न्यूटनला स्वीडनच्या द स्क्वायर, जर्मनीच्या इन द फेड, कंबोडियाच्या फर्स्ट दे किल्ड माय फादर, पाकिस्तानच्या सावन चित्रपटाचं आव्हान आहे. 90व्या अकॅडमी अवॉर्ड्सचं आयोजन 4 मार्च 2018 रोजी लॉस एंजेलिसमध्ये होईल.

समीक्षकांकडून 'न्यूटन'चं कौतुक
समीक्षकांनी 'न्यूटन'चं तोंडभरुन कौतुक केलं आहे. सिनेमाला 4.5 पर्यंतची रेटिंग दिली आहे. सिनेमाच्या दिग्दर्शन आणि सिनेमेटोग्राफीची फार चर्चा होत आहे. याशिवाय डायलॉगही प्रभावशाली आहेत. सुविधा नसलेल्या नक्षलवादी परिसरातील मतदान, निवडणूक यांसारखे गंभीर मुद्दे अतिशय रोचक पद्धतीने मांडण्यात आले आहेत.