Rajesh Khanna :  सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी 1966 साली 'आखरी खत' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट रिलीज होण्याच्या एक वर्ष आधी शशी कपूर (Shashi Kapoor) यांचा 'जब-जब फूल खिले' हा चित्रपट आला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटामुळे राजेश खन्ना यांना त्यांचे नाव बदलावे लागले.


राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना असे होते. त्याच नावाने ते मुंबईत आले होते. पण, शशी कपूर यांच्या 'जब जब फूल खिले' या चित्रपटानंतर राजेश खन्ना यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. खरंतर, या चित्रपटात जतिन खन्ना नावाचा अभिनेता होता. हा चित्रपट हिट झाला, त्यानंतर चित्रपटातील सर्व कलाकारही लोकप्रिय झाले. 


त्याच वेळी राजेश खन्ना देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत होते. चित्रपटसृष्टीत दोन नावे सारखी असल्यास लोकांचा गैरसमज व्हायला नको म्हणून राजेश खन्ना यांनी त्यांचे नाव जतिन खन्ना वरून बदलून राजेश खन्ना असे केले. राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट 'आखरी खत' बॉक्स ऑफिसवर फार चालू शकला नाही. परंतु, जेव्हा राजेश खन्ना यांचा काळ आला तेव्हा चाहत्यांना राजेश खन्नाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. 


आजही सलग 15 हिट चित्रपट देण्याचा विक्रम राजेश खन्नांच्या नावावर आहे. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी 'अमर प्रेम', 'हाथी मेरे साथी', 'आनंद', 'रोटी', 'आराधना', 'दाग', 'सच्चा झूठा', 'अजनबी' आणि 'अपना' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha