मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असलेला अभिनेता म्हणजे रजनीकांत होय. महाराष्ट्र हे मूळ असलेल्या रजनीकांत यांचा आज 67 वा वाढदिवस.


रजनीकांतला जितकं चाहत्यांचं प्रेम मिळालंय तेवढं आजवर कुठल्याचं अभिनेत्याला मिळालं नसेल. कसा झाला रजनीकांतचा प्रवास... कबाली सिनेमानिमित्त एक स्पेशल रिपोर्ट..

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उर्फ द रजनीकांत, जो कधी सुट्टी पाहून सिनेमा रिलीज करत नाही... तर तो फिल्म करतो आणि सुट्टी जाहीर होते.. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बॉस... अवघ्या 67 वर्षांचा हा तरणाबांड महानायक... गेल्या 40 वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा देव आहे... पण काय आहे या चेहऱ्याचा इतिहास? जाऊयात थोडं फ्लॅशबॅकमध्ये.
2 डिसेंबर 1950. बंगलोरमधल्या रामोजी राव आणि रमाबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड. जन्म बंगलोरमध्ये झाला असला, तरी रजनीकांतचे मूळ हे महाराष्ट्रात आहे...


जेजुरीजवळचं कडेपठार हे रजनीकांत यांचं मूळ गाव.. पण पोलिसातल्या नोकरीच्या निमित्ताने रामोजी राव बंगलोरला आले... आणि रजनीकांत यांची कर्मभूमी दक्षिणेत स्थिरावली. रजनीकांत यांच्या घरात मराठी बोललं जायचं... पण कन्नड भाषेतही कुटुंब पारंगत होतं... कुटुंबातला सगळ्यात लहानगा शिवाजी अवघ्या सातव्या वर्षी आईला पोरका झाला... आणि त्यामुळे तीन मुलांची जबाबदारी एकट्या वडिलांवर आली.

1956 मध्ये निवृत्तीनंतर वडिलांनी रजनीकांत यांना रामकृष्ण मठामध्ये दाखल केलं... त्याच मठामध्ये शिकता शिकता रजनीकांत नाटकांमध्ये काम करु लागले...  पौराणिक नाटकांमध्ये एकलव्य आणि दुर्योधनासारख्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या... आणि तिथेच रजनीकांतमधला अभिनेता जागा झाला.

आईचा अकाली मृत्यू आणि वडिलांची निवृत्ती, यामुळे रजनीकांत यांना कोवळ्या वयात नोकऱ्या कराव्या लागल्या... कधी हमाल म्हणून... कधी सुतार म्हणून... रजनीकांत यांनी काम केलं... आणि अखेरीस बंगलोरच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये ते कंडक्टर म्हणून रुजू झाले... पण नोकरीमध्ये रजनीचं मन रमत नव्हतं...  एके दिवशी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटची जाहिरात रजनीच्या हाती लागली... ती जाहिरात होती अभिनय प्रशिक्षणाची... घरच्यांचा नोकरी सोडण्यास तीव्र विरोध होता... पण अशावेळी राज बहाद्दूर नावाचा एक मित्र मदतीला धावून आला... आणि तिथेच रजनीकांत यांचं नशीब पालटलं.

नोकरी सोडून चेन्नई फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेल्या रजनीकांत यांच्यावर नजर पडली ती एक दूजे के लिये या सुपरहिट फिल्मचे दिग्दर्शक के बालचंदर यांची.... त्यांनी रजनीकांत यांना तमिळ भाषा शिकण्याचा सल्ला दिला... बालचंदर यांनी रजनीकांत यांना अपूर्व रागणगल या फिल्ममध्ये पहिली संधी दिली...



फिल्म बॉक्स ऑफिसवर आपटली... पण पुरस्कारांनी तिचा गौरव झाला... पण एका विक्षिप्त नवऱ्याची भूमिका साकारलेला रजनीकांत मात्र छाप सोडून गेला... सुरुवातीच्या काळात, सहाय्यक खलनायक, बलात्कारी, चोर अशाच भूमिका रजनीकांत यांच्या वाट्याला आल्या...

पण प्रतीक्षा फळाला आली... आणि 1977 साली तेलगू फिल्म चिलगम्मा चेप्पिन्डी या फिल्ममधल्ये रजनीकांतला पहिला लीड रोल मिळाला... 1978 पासून रजनीकांत यांच्या फिल्मचा सपाटा सुरु झाला... तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा तब्बल 20 चित्रपटांमध्ये रजनीकांत यांना भूमिका मिळाल्या...

1978 साली आलेल्या भैरवी या फिल्मने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार या पदावर नेऊन ठेवलं... या फिल्मच्या यशाची इतकी चर्चा झाली... की दिग्दर्शक एम भास्कर यांनी रजनीकांतचे 35 फुटी पोस्टर चेन्नईमध्ये झळकवले. 80 च्या दशकापर्यंत रजनीकांतने सुमारे 50 फिल्म्स केल्या... 1980 साली आलेल्या डॉनचा रिमेक बिल्लानं रजनीकांतला साऊथचा अमिताभ अशी ओळख दिली..

पुढे रजनीकांतच्या फिल्म्स अशा काही हिट होऊ लागल्या की तमिळमधली फिल्म, कन्नड आणि तेलगूमध्ये डब होण्याची जणू प्रथाच पडली... मणिरत्नमसोबतचा दलपती सिनेमा हा रजनीच्या आजवरच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक... त्या फिल्ममध्ये रजनी, कमल हसन यांचे जोडी जमून गेली..

रजनीकांत सुपरस्टार होण्यामागे त्याच्या भन्नाट स्टाईल्सचा वाटा मोठा आहे.... त्याची सिगरेट पेटवण्याची स्टाईल तर अदभुतच. गळ्यातला मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात अडकवण्याची स्टाईलही वेगळीच.. पाय फिरवून वावटळ उठवणारा कदाचित दुसरा कुणीच नसावा. गॉगल घालण्याची टेक्निक तर अनेक जण फॉलो करतात. रजनीकांत यांच्या करियरला नवं वळण देणारं वर्ष होतं... 1984. कारण अंधा कानून या फिल्ममधून रजनीकांत यांनी बॉलिवुडमध्ये एन्ट्री घेतली...  सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांच्यसोबत स्क्रीन शेअर केली...

त्यानंतर 1985 सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत बेवफाई या फिल्ममध्ये निगेटिव्ह रोलही साकारला... आणि या फिल्मनं त्या वर्षातली 12 कोटींची सर्वाधिक कमाई केली..फक्त बॉलिवुडच नाही... तर रजनीने हॉलिवुडमध्येही सीमोल्लंघन केलं... 1988 साली ब्लडस्टोन नावाच्या फिल्ममध्ये रजनीकांत यांनी काम केलं...

1991 साली पुन्हा एकदा अमिताभ सोबत हम या फिल्ममध्ये रजनीने महत्त्वाची भूमिका साकारली...  पण त्यानंतर फरिश्ते, आतंक ही आतंक, मेरी अदालत, जॉ जॉनी जनार्दन, वफादार, गिरफ्तार, दोस्ती-दुश्मनी, खून का कर्ज, फूल बने अंगारे... अशा फिल्म्समधून रजनीकांत यांना दुय्यम भूमिका मिळू लागल्या... त्यामुळे रजनीकांत यांनी पुन्हा एकदा दक्षिणेवरच लक्ष केंद्रित केलं.

पण दक्षिणेत जाऊन रजनीकांत यांनी बॉलिवुडलाच दक्षिणेत आणलं... ते शिवाजीमधून...
दक्षिणेतल्या प्रत्येक भाषेत रुलीज झालेला शिवाजी द बॉस... हा हिंदीत रिलीज झाला.. आणि सुपरहिट झाला... 1950 साली जन्मलेला माणूस 57 व्या वर्षीही चिरतरुण दिसणं हेच रजनीकांत यांच्या फिल्मचं वैशिष्ट्य होतं... कारण त्यातली हिरॉईन होती अवघ्या 24 वर्षांची...

खरं तर रजनीकांत यांना विदाऊट मेकअपमध्ये पाहिलं तर धक्का बसतो.., रील आणि रियल लाईफमधला रजनीकांत यांच्यात जमीन आस्मानाचा फरक आहे... पण मेक अप आणि तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुफान एनर्जीच्या बळावर हा माणूस तरण्याताठ्या कलाकारांना लाजवतो... आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे... रोबो
कधीकाळी हिंदी फिल्ममध्ये दुय्यम भूमिका साकारणाऱ्या रजनीकांतच्या अपोझिट या फिल्मध्ये झळकली... मिस वर्ल्ड... ऐश्वर्या राय

रोबोनंतर 2014 मध्ये लिंगा या फिल्ममधून पुन्हा एकदा रजनीकांत यांनी जोरदार कमबॅक केलं... हिंदीमध्ये ही फिल्म फार चालली नसली, तरी साऊथमध्ये या फिल्मनं बक्कळ गल्ला जमवला... आणि आता गोष्ट कबालीची... या फिल्ममध्ये रजनीकांत यांनी एका डॉनची भूमिका साकारली आहे.


पण रील लाईफमध्येही रजनीकांत हे डॉनच आहेत... अभिनयातले डॉन... एखाद्या डॉनप्रमाणेच या माणसानं ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन राज्य केलं... वयाच्या 65 व्या वर्षी लीड रोल करणाऱ्या रजनीकांतच्या अपोझिट या फिल्ममध्ये अवघ्या पंचविशीत असलेली राधिका आपटे आहे...

रजनीकांत यांच्या आयुष्याची कहाणी शाळेच्या पुस्तकात छापली गेली आहे. रजनीकांत यांचे ट्विटरवर तब्बल 40 लाख फॉलोअर्स आहेत. अतिशयोक्तीचे सर्वाधिक जोक्स बनणारा कलाकार अशीही त्यांची ओळख आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. रजनीकांत यांच्या दातृत्त्वाचे किस्सेही जगभरात प्रसिद्ध आहेत. इतकंच नाही, तर दक्षिणेत रजनीकांत यांची चक्क मंदिरं आहेत..

एका बस कंडक्टरपासून सुरु झालेला प्रवास महानायकापर्यंत येऊन पोहोचला आहे. बॉलिवुडमध्ये जाऊन यश मिळालं नाही, म्हणून न खचता या माणसानं बॉलिवुडलाच आपल्याकडे खेचलं... फक्त अभिनेता म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही तो सुपरस्टार आहे... रजनी काहीही करू शकतो... हा फक्त विनोद न राहता... आता त्रिकालाबाधित सत्य बनलं आहे... पडद्यावरच्या इमेजच्या बंधनात न अडकता, जसा आहे, तसा तो फॅन्सना धडधडीत सामोरंही जातो... आणि म्हणूनच तो आहे... रजनी... थलाईव्हा... अर्थात...  द बॉस