Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अथांग (Athang) या मराठी वेब सीरिजच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं (Tejaswini Pandit) राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. माझं पहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. तसेच चित्रपट, वेब सीरिज या सर्व विषयांवर राज ठाकरे यांनी त्यांची मत मांडली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉरशिपबद्दल तुमचं काय मत आहे? असा प्रश्न तेजस्विनीनं या कार्यक्रमामध्ये विचारला. राज ठाकरे यांनी या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाले राज ठाकरे?
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉरशिपबद्दल तुमचं काय मत आहे? या प्रश्नाला उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, 'तुम्ही सीरिजमध्ये नेमकं काय दाखवणार आहात? आणि त्या सीनसोबत त्याचा काय संबंध आहे, हे कळावं. मध्यंतरी मी एक वेब सीरिज बघत होतो. त्यात व्याकरणापुरतं मराठी होतं. बाकी सगळ्या शिव्या होत्या. त्या सीरिजची ती गरज असेल तर कोणतीही बंधन असताना कामा नये.'
फिल्म मेकिंगबाबत काय म्हणाले राज ठाकरे?
तेजस्विनीनं या कार्यक्रमात राज ठाकरेंना फिल्म मेकिंगबाबत देखील प्रश्न विचारला. 'तुम्ही सांगितलं, की फिल्म मेकिंग हे तुमचं पहिलं पॅशन आहे. तर तुम्ही आगामी काळात कोणत्या फिल्म मेकिंग किंवा दिग्दर्शन करताना आम्हाला दिसणार आहात?' या प्रश्नाला उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, 'राजकारण आणि चित्रपट या मोठ्या गोष्टी आहेत. निवडणुका हा एक धंदा आहे आणि हा कधी संपतच नाही. ही झाली की ती... त्यामुळे याविषयाकडे लक्ष द्यायला जर वेळ मिळाला तर नक्की मी चित्रपटाची निर्मिती करेन. आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक चित्रपट येत आहेत. त्यामुळे माझी आता हिंमत होत नाही की मी त्या विषयावर काम करावं. पण जेव्हा मी गांधी चित्रपट पाहिला. तेव्हा मला वाटतं होतं की महाराजांवर तसा चित्रपट व्हायला हवा. माझं त्या चित्रपटावर काम सुरु आहे. तीन भागांमध्ये तो चित्रपट येईल.'
अथांग या मराठी वेब सीरिजमध्ये निवेदिता जोशी सराफ, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, भाग्यश्री मिलिंद, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: