मुंबई : बॉलिवूडच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबाने घेतला आहे. मुंबईतील चेंबुरमध्ये दोन एकर परिसरात असलेल्या या स्टुडिओचं मूल्य पाचशे कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.

स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न आणि देखभाल खर्चाची सांगड घालता येत नसल्यामुळे आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचं ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं. मात्र अद्याप या स्टुडिओच्या विक्रीची किंमत ठरलेली नाही.

आर. के. स्टुडिओ आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आहे. कित्येक सुपरहिट चित्रपटांचं चित्रीकरण या स्टुडिओमध्ये झालं. 'शो मॅन' राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. आग, बरसात, आवारा, श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी, राम तेरी गंगा मैली यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांचं शूटिंग या स्टुडिओमध्ये झालं होतं.

आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय काहीच दिवसांपूर्वी कपूर कुटुंबीयांनी जाहीर केला होता. राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, पुत्र रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर, कन्या रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला. स्टुडिओच्या विक्रीनंतर येणारा नफा स्टुडिओशी संबंधित प्रत्येकाला देण्यात येणार असल्याचंही कपूर कुटुंबीयांनी स्पष्ट केलं होतं.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आर के स्टुडिओला भीषण आग लागली होती. आगीत स्टुडिओचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे स्टुडिओ पुन्हा उभा करणं मोठं खर्चिक आणि अशक्य असल्याने तो विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतला.