मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या आधी राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित सिनेमांची निर्मिती होताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही बायोपिक येणार आहे.
'माय नेम इज रागा' असं राहुल गांधींच्या बायोपिकचं नाव आहे. नेहमीच चर्चेत राहणारे मल्याळम दिग्दर्शक रुपेश पॉल या सिनेमाची निर्मित करत आहेत. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन रुपेश पॉल करणार आहेत. सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून राहुल गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता अश्विनी कुमार झळकणार आहे.
सिनेमात लहानपणापासून ते सध्या असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी असा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. जवळपास 4 मिनिटांच्या टीझरमध्ये राहुल गांधी लहान असताना त्यांची आजी म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आल्याच दाखवण्यात आलं आहे. या घटनेनंतर राहुल गांधी घाबरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. तर त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासोबतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
अॅक्सिडेंन्टल प्राईम मिनिस्टर सिनेमात पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर यांनी साकारली होती. तर या सिनेमात मनमोहन सिंग यांच्या भूमिकेच अनुपम खेर यांचा भाऊ राजू खेर झळकणार आहे. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देखील दाखवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका हिमंत कपाडिया साकारत आहे.
निवडणुका तोंडावर असताना राहुल गांधी यांचा राजकीय प्रवास कसा होता. विरोधकांच्या भाषेत पप्पू ते परिपक्व राजकारणी असा त्यांचा प्रवास या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे, असं एकूण चित्र समोर येत आहे. मात्र या सिनेमामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कितपत फायदा मिळेल, हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.
टीझर