Rahat Fateh Ali Khan Net Worth : प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राहत फतेह अली खान यांनी हे वृत्त फेटाळून लावत कोणत्याही चर्चांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाहत्यांना केले. राहत फतेह अली खान हे याआधीही काही गैरप्रकार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते.
1974 मध्ये जन्माला आलेले राहत फतेह अली खान यांचा जन्म संगीतकार कुटुंबात झाला. राहत यांचे काका नुसरत फतेह अली खान हे प्रसिद्ध कव्वाली गायक होते. त्यांची लोकप्रियता त्यांच्या निधनानंतर अजूनही कायम आहे. राहत फतेह अली खान यांनी आपल्या गाण्याच्या शैलीने लोकांच्या मनावर छाप सोडली. राहत फतेह अली खान यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. संगीतातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपले नाव कायम ठेवत राहत फतेह अली खान यांनी आपली वेगळी शैली निर्माण करताना आपल्या घराण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.
पहिलेच गाणं झालं लोकप्रिय
राहत सात वर्षांचा असताना नुसरत फतेह अली खान यांनी गायनाने प्रशिक्षण दिले. राहतचा जन्म फतेह अली खान यांच्या प्रसिद्ध कव्वाल कुटुंबात झाला. परिणामी, राहतने बॉलिवूडमध्ये ही पार्श्वगायनाचा पर्याय स्वीकारल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'पाप' चित्रपटातील 'मन की लगन' हे त्यांचे पहिलेच गाणं चांगलेच लोकप्रिय झाले.
परदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप...
राहत फतेह अली खान यांच्यावर भारतात परदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप लावण्यात आला. या प्रकरणी ईडीने त्यांना नोटीसही धाडली होती. राहत यांना परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार (Foreign Exchange Management Act- FEMA) ही नोटीस बजावण्यात आली होती. वर्ष 2011 मध्ये राहत आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना दिल्ली विमानतळावर 1.24 लाख डॉलरसह पकडण्यात आले होते. चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोडून दिले. फेमाच्या नियमानुसार, परदेशी नागरीक हा 5000 डॉलर आणि ट्रॅव्हलर्स चेक किंवा इतर कोणत्या स्वरुपातही 5000 डॉलरपेक्षा प्रवास करू शकत नाही.
राहत फतेह अली खान यांची संपत्ती किती?
एका रिपोर्टनुसार, राहत फतेह अली खान यांची संपत्ती ही 7.5 दशलक्ष डॉलरच्या आसपास (भारतीय चलनात सुमारे 58 कोटी रुपये) असल्याचे म्हटले गेले. कव्वाली, पार्श्वगायन, लाइव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून राहत फतेह अली खान यांची कमाई होते.