Bhramanti Song : महाराष्ट्रातील थोर संत समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आधारलेल्या 'रघुवीर' (Raghuveer) या चित्रपटाचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या चित्रपटात समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका अभिनेता विक्रम गायकवाड हे साकारणार आहेत. ज्ञान आणि भक्तीचा संगम घडवत सोप्या सर्वसामान्य जनतेला शब्दांत आध्यात्माचे ज्ञानामृत पाजणाऱ्या स्वामींचे विश्वव्यापी रुप मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे. त्यांच्यासाठी जणू संगीतमय नजराणा असलेलं 'रघुवीर'मधील एक सुरेल गीत नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.


निलेश कुंजीर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'रघुवीर' ची प्रस्तुती सिनेमास्टर्स एन्टरटेन्मेंटची असून, निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगाने समर्थ क्रिएशन्स यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक आणि अरविंद सिंह राजपूत या चित्रपटाचे निर्माते असून, वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लि. या चित्रपटाचे वितरक आहेत. 'भ्रमंती' या गाण्यात रामदास स्वामींची भ्रमंती पहायला मिळते. सूर्योदयाच्या समयी भास्कराच्या साक्षीने सूर्यनमस्कार घालणारे समर्थ रामदास स्वामी या गाण्याच्या सुरुवातीला दिसतात. 'अपार उर्जा...' या शब्दांनी गाण्याची सुरुवात होते. त्यानंतर रानावनांत भटकरणारे, क्षुधाशांतीसाठी करवंदे खाणारे, वृक्षाखाली विश्रांती घेणारे, ध्यानधारणा करणारे, मैलो न मैल पायी वाटचाल करणारे, बर्फवृष्टीतही नित्यनेम करणारे, स्वयंपूर्ण व्हा, स्वयंसिद्ध व्हा असा संदेश देणारे आणि खलनाश करण्यासाठी शस्त्र धरा असा उपदेश करणारे अशी स्वामींची विविध रुपं गाण्यात दिसतात. गाण्यातील लोकेशन्स नयनरम्य असून, कॅमेरावर्क अफलातून आहे. 'जय जय राम...' हा गाण्यातील मंत्रोच्चार मनात रुंजी घालणारा आहे. 'जय जय रघुवीर समर्थ' या समर्थांच्या मंत्राने 'भ्रमंती' हे गाणं संपतं. गीतकार मंदार चोळकरने लिहिलेलं हे गाणं संगीतकार अजित परबने रवींद्र साठे आणि स्वत:च्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे.


पाहा 'भ्रमंती' गाणं



निलेश कुंजीर यांनी अभिराम भडकमकर यांच्या सोबत पटकथा लिहिली असून भडकमकर यांनी संवादलेखन केलं आहे. टायटल रोलमधील विक्रम गायकवाडसोबत यात ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, गणेश माने यांच्याही भूमिका आहेत. 'भ्रमंती' गाण्यातील नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी डिओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी केली असून, जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी संकलन केलं आहे. सचिन सुहास भावे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Raghuveer: 'रघुवीर' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता