मुंबई : बॉक्स ऑफिसवर किंग खान शाहरुखचा 'रईस' आणि सुपरस्टार सलमान खानचा 'सुलतान' यांची टक्कर पाहायला मिळणार नाही. कारण 'रईस'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे दोन्ही चित्रपट 'ईद'ला रिलीज होणार अशी चर्चा होती.
शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि माहिरा खानचा स्टारर 'रईस' आता 27 जानेवारी, 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे, असं चित्रपटाचे निर्माते रितेश सिद्धवानी यांनी सांगितलं.
"दोन्ही चित्रपटांची रिलीज डेट मागे-पुढे करणं योग्य ठरेल, कारण कमाईच्या बाबतीत कोणत्याही सिनेमाचं नुकसान व्हायला नको," असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
"आदित्य चोप्रा (सुलतानचा निर्माता) आणि फरहान अख्तर (रईसचा निर्माता) दोघेही माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत. बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी मी आदित्य आणि सलमानशी बोलेन. तसंच याआधी मी फरहानशी चर्चा केली आहे. मात्र आम्हाला प्रदर्शनाची तारीख बदलण्याची गरज वाटली तर आमच्यापैकी कोणीतरी तारीख बदलू," असं शाहरुखने सांगितलं.
शाहरुख आणि निर्मात्यांना 'रईस'ची रिलीज डेट बदल्याबाबत कोणताही इगो प्रॉब्लेम नाही, असंही शाहरुख म्हणाला.
राहुल ढोलकिया 'रईस'चा दिग्दर्शक आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.