मुंबई: 'इंदू सरकार' चित्रपटात इंदिरा आणि संजय गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला तर राज्यात तीव्र पडसाद उमटू शकतात, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. तसं पत्रक आज त्यांनी जाहीर केलं आहे.
‘या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधित असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे वस्तुस्थितीशी छेडछाड करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्व. संजय गांधी यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू शकतात.’ असा इशाराही विखे-पाटलांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा. अशी मागणी विखे-पाटलांनी केली आहे.