'मी जात, पात, धर्म, पंथ मानत नाही... मला एकच कळतं की मी कलाकार म्हणून जन्माला आलोय, आणि माझ्या कलेचा अपमान मी खपवून घेणार नाही. राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय?' असा संतप्त सवाल पुष्करने फेसबुकवर उपस्थित केला आहे.
'मी ह्या घटनेला निषेध करतो आणि जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाहीत, तोपर्यंत मी पुण्यात प्रयोग करणार नाही' अशी भूमिका पुष्कर श्रोत्रीने घेतली आहे.
पुष्कर श्रोत्रीची फेसबुक पोस्ट :
पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्या चार संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले अशी त्यांची नावं आहेत. हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गडकरींचा पुतळा हटवतानाची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. ही दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. काल मध्यरात्री 4 तरुण पुतळा हटवताना यात स्पष्टपणे दिसून येत आहेत. आधीच संभाजी ब्रिगेडनं या कृत्याची जबाबदारी स्वीकारली होती.
राम गडकरींचा पुतळा हटवला
नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणाऱ्या मुठा नदीत पुतळा फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान चार कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याआधारेच आता पोलिस तपास करत आहेत. पण पुतळ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.