बंगळुरु : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी हिचा पुतळा बंगळुरुत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरुत अभिनेत्री सनी लिओनीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता. पण याच कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी एका संघटनेनं तिच्या पुतळ्याचं दहन केलं आहे.
'कर्नाटक रक्षना वेदिका युवा सेना' या संघटनेनं सनी लियोनीच्या कार्यक्रमाला विरोध केला असून यावेळी तिचा पुतळाही जाळण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सनी लियोनीनं शहरात शो केल्यानं शहरातील संस्कृतीवर परिणाम होईल असा दावा या संघटनेनं केला आहे. दरम्यान, मागील वर्षीही सनीच्या कार्यक्रमाला विरोध झाला होता.
सनी लियोनीला पहिल्यांदाच विरोध झालेला नाही. याआधीही तिला अनेकदा विरोध सहन करावा लागला आहे. बिग बॉस शोच्या माध्यमातून तिने जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री केली त्यावेळीही तिला विरोध झाला होता. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यानं तिला विरोध झाला होता.