मुंबई: राजस्थान,गुजरातमध्ये पद्मावत सिनेमाला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी विरोध वाढताना दिसत आहे.


करणी सेना, रजपूत संघर्ष सेनेकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.

मुंबई

मुंबईत करणी सेनेच्या 50 कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आलं.

धुळ्यात तापी नदीत आंदोलन

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथील राजपूत समाजाच्यावतीनं पद्मावत सिनेमाला संपूर्ण देशात बंदी आणावी या मागणीसाठी तापी नदीत उतरून आंदोलन सुरु केलं. लहान मुलं, मुली, महिला देखील या आंदोलनात सहभागी झाले.



राजपूत समाजाच्यावतीने धुळे जिल्ह्यात चिमठाणे, तसेच धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

दरम्यान, उद्या सर्व समाजाच्यावतीने शिंदखेडा बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, तापी नदीत आंदोलन करणाऱ्यांपैकी केदार गिरासेयांची प्रकृती खालावल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

नाशिकमध्ये आंदोलन

नाशिकमधील गंगापूर धरण प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.

यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या 30 ते 35 आंदोलकांना धरणाच्या बाहेरील प्रवेशद्वारावर पोलिसांनी ताब्यात घेतले.

अकोला- उद्या 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजपूत समाजाचे वसंत टाँकीजसमोर निदर्शन, बॅनर-पोस्टर लावण्यास केला मज्जाव.

येवला येथे राजपूत संघर्ष समिती तर्फे मोटरसायकल रॅली काढून निदर्शने.पद्मावती सिनेमाला विरोध करण्यासाठी मोटरसायकल रॅली काढून विरोध केला.

अहमदाबादेत टोकाचा विरोध

अहमदाबादमध्ये पद्मावत चित्रपटाला होणारा विरोध टोकाला पोहोचला. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधील चित्रपटगृहांबाहेरील गाड्यांना आग लावली, तर चित्रपटगृहात तोडफोड केली. शहरातील वस्त्रापूर आल्फावन मॉल, हिमालया मॉल, तसेच पीव्हीआर मॉल बाहेर उभ्या गाड्यांना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आग लावली.

गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला.

मनसेचा पद्मावतला पाठिंबा

तर इकडे महाराष्ट्रात मनसेनं पद्मावत चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर मनसे या सिनेमाच्या दिग्दर्शक-कलावंतांच्या संरक्षणासाठी सक्षम आहे. असं मनसेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.