मुंबई : दक्षिण भारताची वीरांगणा महाराणी वीरमादेवी यांच्या जीवनावर आधारित तामीळ चित्रपट बनत आहे. या सिनेमात सनी लिओनी वीरमादेवी यांच्या भूमिकेत दिसणार असून यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकातील अनेक सामाजिक संघटनांनी याला जोरदार विरोध केला आहे. सनी लिओनीचा हा पहिला तामीळ चित्रपट आहे.

कर्नाटक रक्षण वेदिके (केआरवी) आणि त्यांच्या युवा संघटनांच्या मते, "आम्हाला अकराव्या शतकातील विरांगणा वीरमादेवीच्या भूमिकेत सनी लिओनीला पाहायचं नाही. पॉर्न चित्रपटांची अभिनेत्री सनी लिओनी एका विरांगणेची भूमिका साकारु शकत नाही. वीरांगणा वीरमादेवी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याला आमचा विरोध नाही तर सनी लिओनीला आमचा विरोध आहे." "तसंच चित्रपटाच्या निमित्ताने सनी लिओनी जिथे जाईल, तिथे तिचा विरोध केला जाईल," असंही कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने सांगितलं.

सती गेली होती वीरमादेवी
हा चित्रपट तामीळसह कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चोल सम्राज्याचे शासक राजेंद्र पहिले यांची पत्नी वीरमादेवी यांच्या जीवनावर आधारित आहे. राजा चोलने आपल्या साम्राज्याचा विस्तार श्रीलंका, मलेशिया आणि इंडोनेशियापर्यंत केला होता. राजाच्या निधनानंतर वीरमादेवी सती गेल्या होत्या. वादियुदैयान हे ‘वीरमादेवी’चे दिग्दर्शक असून नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच कर्नाटक रक्षण वेदिके आणि युवा संघटनेने विरोधाती तयारी केली आहे. हा चित्रपट कर्नाटकमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे विरोधाची ही ठिणगी इतर राज्यांमध्येही पसरु शकते.