मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत तिचे चित्रपट, कलाकारांसोबतच्या भांडणामुळे कायमच चर्चेत असते. आता तिने अभिनेत्री सोनम कपूरवर निशाणा साधला आहे. "माझा निवाडा करणारी सोनम कपूर कोण आहे," असा संतप्त सवाल कंगनाने विचारला आहे.
कंगनाने 'क्वीन' सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत एका कार्यक्रमात कंगनाने केलेल्या आरोपांबाबत सोनमला विचारणा करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीला तिने ही घटना दु:खद असल्याचं सांगितलं. परंतु प्रत्येक वेळ कंगनावर विश्वास ठेवणं अवघड आहे," असंही सोनम नंतर म्हणाली.
सोनमच्या विधानावर कंगना काय म्हणाली?
सोनमचं हे वाक्य कंगनाच्या जिव्हारी लागलं आणि तिने तातडीने एक पत्रक जारी केलं. यात तिने लिहिलं आहे की, "माझा निवाडा करण्याचा अधिकार सोनमला कोणी दिला. कोणत्या महिलेवर विश्वास ठेवायचा आणि कोणतावर नाही, याचा परवाना सोनमकडे आहे का? माझा आरोपांवर ती प्रश्न कसे काय उपस्थित करु शकते. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. माझी ओळख माझ्या वडिलांमुळे नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर स्वत:चं स्थान/ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री म्हणून सोनमची काहीच ओळख नाही. शिवाय एक वक्ता म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात नाही. या फिल्मी लोकांना माझी थट्टा करण्याचा अधिकार कोण देतं?"
संपूर्ण प्रकरण काय आहे, कसा सुरु झाला वाद?
हे प्रकरण 2015 मधील 'फॅण्टम'च्या "बॉम्बे वेल्वेट" या सिनेमाच्या प्रमोशनल टूरदरम्यानचं आहे. सिनेमाच्या क्रूमध्ये असलेल्या एका महिलेने "हाफिंग्टन पोस्ट"ला दिलेल्या मुलाखतीत विकास बहल यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. महिलेने याची तक्रार फॅण्टम फिल्म्सच्या अनुराग कश्यपकडेही केली होती. परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र प्रकरण समोर आल्यानंतर अनुरागने आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली होती.
या प्रकरणात कंगना राणावतनेही महिलेचं समर्थन करत विकास बहलवर लैंगिक शोषणाने आरोप केले होते. कंगनाने दिग्दर्शक विकास बहलसोबत "क्वीन"मध्ये काम केलं होतं.