Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ता चंद्रमुखी सिनेमामुळे चर्चेत आली नाही तर राज ठाकरेंसंबंधित केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आज 3 तारीख असे म्हणत प्राजक्ताने भोंग्यांच्या अल्टिमेटमची आठवण करुन दिली आहे. 


प्राजक्ताने पोस्ट लिहिल्यानंतर लगेचच एडिट केली आहे. पण तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मात्र चांगलीच व्हायरल होत आहे. प्राजक्ताने राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणारी पोस्ट लिहिली होती. पण काही वेळातच तिने ही पोस्ट एडिट केली. पण या पोस्टची सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. प्राजक्ताने तिचा फोटो शेअर करत एका बातमीच्या कात्रणाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.





प्राजक्ता माळीची पोस्ट नक्की काय होती? 


"सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा.. आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो पोस्ट करत आहे. असो... आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. राज ठाकरे धन्यवाद... परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या-महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरुन आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशाप्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं...?"



प्राजक्ता माळीने याआधी शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातदेखील हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हटके कॅप्शनदेखील लिहिले होते.