मुंबई : 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी 'साहो' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'सायको सैयाँ' असे या गाण्याचे बोल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून फॅन्स या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण गाण्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आल्याने फॅन्सची उत्सुकता आणखी वाढली होती.
गाण्यात प्रभास आणि श्रद्धा कपूरची केमिस्ट्री दिसून येत असून प्रभास त्याच्या हटके स्टाईलमध्ये डान्सही करताना दिसत आहे. 'सायको सैयाँ' गाणं हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या चार भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. सचिन टंडन, ध्वनी भानुशाली आणि तनिष्क बागची यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला काही तासातच 25 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी 'साहो' टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझर पाहिल्यानंतर सिनेमात जबरदस्त अॅक्शन असणार आहे हे दिसून येत आहे. बॉलिवूडमधील महागड्या अॅक्शन सिनेमांपैकी एक असून या सिनेमावर जवळपास 300 कोटी रुपये खर्च झाल्याचं बोललं जात आहे. मात्र टीझर पाहिल्यानंतर सिनेमाची कथा काय असेल याचा अंदाज लावणं कठीण जात आहे.
साहोच्या टीझरलाही यूट्युबवर चार कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. प्रभासच्या बाहुबली आणि बाहुबली-2 सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता साहो सिनेमाही बॉक्स ऑफिसवर अशीच कमाल करेल, अशी आशा सिनेमाच्या निर्मात्यांना आहे.
साहो सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, अरुण विजय, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही सिनेमात भूमिका आहेत. सिनेमाचा दिग्दर्शन सुजीतने केलं आहे.