'सत्यमेव जयते', 15 ऑगस्टला जॉनचा नवा सिनेमा
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2018 07:15 PM (IST)
जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यमेव जयते’ हा नवा सिनेमा येत आहे. जॉनच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या पिळदार शरीरासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यमेव जयते’ हा नवा सिनेमा येत आहे. जॉनच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. मिलाप मिलान झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. “या स्वातंत्र्यदिनी, न्याय मिळणार,” असं म्हणत चित्रपटाचं पहिलं पोस्टर जॉनने ट्विटवर शेअर केलं. ‘बेईमान पीटेगा,करप्शन मिटेगा’ अशी टॅगलाइन असणाऱ्या ‘सत्यमेव जयते’तून समाजातील ज्वलंत प्रश्नांना हात घालण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. या सिनेमात जॉनसोबतच मनोज वाजपेयीदेखील प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावर्षी एप्रिलमध्ये दाखवण्यात आलेल्या सिनेमाच्या पहिल्या लूकमध्ये मनोज वाजपेयीने जॉनच्या फोटोवर बंदूक रोखलेली पाहायला मिळाली. काही महिन्यांपासूनच या दोघांनी चित्रपटाच्या शूटबाबतचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले होते. “मनोजसोबत काम करणं मी स्वत:चा सन्मान समजतो, खरोखरच हा खूप मजेदार अनुभव होता,” असं जॉनने ट्विटरवर म्हटलं होतं. दरम्यान, 15 ऑगस्टला अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि कंगना रणावतचा ‘मनिकर्णिका’ हा सिनेमाही रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या तीन मोठ्या सिनेमांची टक्कर पाहायला मिळेल.