Mani Ratnam On Bollywood Industry: हिंदी चित्रपटसृष्टीने स्वतःला बॉलिवूड म्हणणं बंद केलं पाहिजे, त्यामुळे इतर भाषांतील चित्रपटांना त्यांचा हक्क मिळेल, त्यांना त्यांचीही ओळख निर्माण करता येऊ शकेल असं वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केलं आहे. 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांबद्दल बोलायचं झालंच तर त्यात मणिरत्नम यांच्या नावाचा नक्कीच उल्लेख असेल. मणिरत्नम हे त्यांच्या अप्रतिम दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाद्वारे मणिरत्नम यांनी हे सिद्ध केले की त्यांना असंच इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता म्हटलं जात नाही. सध्या मणिरत्नमचे नाव 'पोनियिन सेल्वन 2' या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. दरम्यान, मणिरत्नम यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. यानंतर हिंदी सिनेसृष्टीतील प्रत्येकाने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
मणिरत्नम यांनी बॉलिवूडबद्दल केलं मोठं वक्तव्य
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, नुकतेच चेन्नईतील सीआयआय साऊथ मीडिया आणि एंटरटेनमेंट समिटच्या दुसऱ्या आवृत्तीत 'पोनियिन सेल्वन 2' चे दिग्दर्शक मणिरत्नम यांनी जागतिक चित्रपटांवर असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रभावावर भाष्य केले आहे. यावेळी पॅनेल सदस्यांपैकी एक म्हणून उपस्थित असलेले मणिरत्नम यांनी मनमोकळेपणे चर्चा केली.
मणिरत्नम म्हणाले की, 'हिंदी चित्रपटसृष्टीने स्वत:ला बॉलीवूड म्हणणे बंद केले तर इतर चित्रपटांना त्यांचा हक्क मिळेल. यामुळे लोक भारतीय सिनेमाला फक्त बॉलीवूड म्हणून ओळखणे बंद करतील.' अशा स्थितीत आता अंदाज लावला जाऊ शकतो की आगामी काळात आणखी काही सेलिब्रिटी या विषयावर आपले मत मांडू शकतात.
लवकरच प्रदर्शित होतोय मणिरत्नम यांचा 'पोनियिन सेल्वन 2' हा चित्रपट
प्रत्येकजण दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'पोनियिन सेल्वन 2' ची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. अशा परिस्थितीत, मणिरत्नमच्या PS-2 (Ponniyin Selvan 2) च्या रिलीजच्या तारखेचा विचार कराल, तर हा चित्रपट 28 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.