या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख असलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सैराटचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
तर दुसरीकडे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही 'सैराट'ची भरभरुन स्तुती केली आहे.
तसंच सैराट सिनेमा जरुर पाहा, असं ट्विट सईने केलं आहे.
यापूर्वी सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवशीही सईने ट्विट करुन, 'सैराट'साठी प्रचंड उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. तसंच चाहत्यांनी सिनेमागृहात जाऊन सैराट पाहावा, असंही आवाहन तीने केलं होतं.
रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेने सैराट
दरम्यान, सैराटने अवघ्या चार दिवसात 15.10 कोटींची कमाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या विकेंडला इतकी कमाई करणारा हा मराठीतील पहिला सिनेमा ठरला आहे.
यानंतर सोमवारी या सिनेमाने 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
‘सैराट’ने शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4. 85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटने 15.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
29 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं आहे.
सैराटलाही पायरसीचं ग्रहण
प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ची कॉपी यू ट्यूबवर लिक झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यू ट्यूबवर चक्क सेन्सॉर कॉपी अपलोड करण्यात आली होती.
याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे. नागराज मंजुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.