मुंबई : सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोड बातमी मिळाली आहे. सुनिधीने 1 जानेवारीच्या मुहूर्तावर मुंबईत गोंडस मुलाला जन्म दिला.

सुनिधी आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती तिच्या डॉक्टरांनी दिली. 1 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुनिधीची डिलीव्हरी झाली.

मुंबईतील सुर्या हॉस्पिटलमध्ये सुनिधीने बाळाला जन्म दिला. याच रुग्णालयात करण जोहर, जॉन्टी ऱ्होड्स, श्वेता तिवारी यासारख्या सेलिब्रेटींना अपत्यप्राप्ती झाली होती.

सुनिधी चौहान आणि पती हितेश सोनिक

1995 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ती डीडी चॅनेलवरचा पहिला वहिला म्युझिक रिअॅलिटी शो 'मेरी आवाज सुनो'ची विजेती ठरली होती. करिअरच्या सुरुवातीला मस्त, फिजा, अजनबी, चमेली यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने गायलेली गाणी गाजली. डेब्यूमध्येच फिल्मफेअरसारख्या पुरस्कारही सुनिधीने पटकावले.

2002 मध्ये सुनिधीने दिग्दर्शक-कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्नगाठ बांधली. मात्र अवघ्या वर्षभरातच ते विभक्त झाले.

त्यानंतर 'मेरी आवाज सुनो'पासून तिचा मित्र असलेला संगीतकार हितेश सोनिक सोबत तिने 24 एप्रिल 2012 रोजी लग्न केलं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात म्हणजेच 34 व्या वाढदिवशी तिने आपण प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं.