Falguni Pathak : फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. बोरिवलीतील क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेवर प्रवेशासाठी शुल्क आकारल्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


दांडीया क्वीन फाल्गुनी पाठकच्या गरबा कार्यक्रमावर आक्षेप घेत एका खेळाच्या मैदानाचं व्यावसायिकीकरण रोखण्याची मागणी करत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


काय आहे याचिका? 


बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बोरीवली येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील भुखंड खेळाचं मैदान म्हणून निश्चित केलेला आहे. मात्र, या मैदानावर नवरात्रोत्सवानिमित्त फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याची नोंद घेत सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी या कार्यक्रमावरच जोरदार आक्षेप घेतला आहे. या कार्यकमासाठी 800 ते 4200 रुपयापर्यंत तिकिटाचे दरही निश्चित करण्यात आल्याचा आरोप करत या आयोजनाला याचिकेतून आक्षेप घेतला आहे.


हे खेळाचे मैदान सर्वांसाठी खुलं असताना अशा प्रकारे तिथं कार्यक्रमाचं आयोजन करून त्याचं व्यावसायिकीकरण केलं जाऊ नये, अशी मागणी याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत संगीत कार्यक्रम अथवा नवरात्रोत्सवात गरब्यासाठी या क्रिडांगणाचा वापर होत असेल तर मैदानावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Navratri 2022 : नवरात्री आणि गरब्याचा संबंध काय? जाणून घ्या नवरात्रीत गरबा का खेळला जातो


Navratri 2022 : यंदाच्या नवरात्रीत पारंपरिक पेहरावाला द्या हटके लूक; फॉलो करा 'या' स्टायलिंग टिप्स