आपल्याला नेमका कसा सिनेमा बनवायचा आहे हे मनाशी ठरवून घेतलं पाहिजे. म्हणजे, लोकांची हसवणूक करणारा सिनेमा बनवायचा आहे की हसत हसत कोपरखळ्या मारणारा चित्रपट बनवायचा आहे की आणखी काही... ते ठरवलं तर पुढे त्याचा सिनेमा बनवणं सोपं होतं. हिंदी मीडिअम हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. साध्या सोप्या भाषेमध्ये शिक्षण क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार सिनेमातून मांडला गेला. हसत हसत या क्षेत्रावर भाष्य करण्यात आलं. म्हणूनच अंग्रेजी मीडिअम या सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्या. पुन्हा त्यात इरफान खान असल्यामुळे चेरी ऑन द केक अशी अवस्था होती. अपेक्षा बाळगणं चूक नाही. पण विनोद निर्मितीच्या नादात हस्यास्पद ठरणं हे जरा घातकी आहे. अंग्रेजी मीडिअमच्या बाबतीत असं झालं आहे.


सिनेमाची सुरूवात छान आहे. चंपकलाल बन्सल यांना एक मुलगी. तिला लंडनमध्ये प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकायला जायचं आहे. मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाप कंबर कसतो. स्थिती नसूनही तिला लंडनला न्यायचं ठरवतो. पण लंडन विमानतळावर उतरल्यानंतर केवळ इंग्रजीच्या घोळामुळे बापाला परत भारतात यावं लागतं आणि मुलगी इमिग्रेशन होऊन लंडनमध्ये जाते. मग तो बाप परत कसा तिकडे जातो.. त्याला त्यासाठी काय काय दिव्य करावे लागतात त्याची ही गोष्ट आहे.


या सिनेमातल्या अनेक सिच्युएशन्स ओढून ताणून आणल्या आहेत. ड्रगवरून झालेला शब्दांचा घोळ.. श्रीमंतांच्या डोनेशनच्या बोलीसाठी चोरली जाणारी पत्रिका.. दुबईवरून लंडन गाठण्याचा उद्योग हे सगळं हसवतं पण ते हस्यास्पद ठरतं. हिंदीवाल्यांना कदाचित अशी कॉमेडी नवी असेल पण आपल्याकडे टीव्हीवर रोज अशीच कॉमेडीी रचली जाते आणि तितकीच छान सादर केली जाते. पण तिचा हेतूच तो असतो. या सिनेमाचं मात्र उलटं झालं आहे. अशा अनेक प्रसंगांमुळे हा सिनेमा थिल्लर होतोय की काय वाटतं. आपलं हे वाटणं सिनेमा संपेपर्यंत खात्रीत बदलत नाही कारण, त्यात इरफान खान आहे. कमाल ताकदीने त्याने चंपकलाल बन्सल उभा केला आहे. त्याचे डोळे.. टायमिंग अफलातून आहे. त्याला तितकीच जबरदस्त साथ दिली आहे ती दिपक दोब्रियाल यांनी. शिवाय राधिका मदन, डिंपल कपाडिया, करीना कपूर, किकू शारदा ही सगळीच मंडळी आपआपल्या भूमिकेत चपखल बसली आहेत. म्हणूनच हा सिनेमा खिळवून ठेवतो. त्यात इरफानचे छोटे छोटे संवाद मजा आणतात. पण त्यानंतर संपूर्ण सिनेमावर आपण जेव्हा दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा मात्र मन खट्टू होतं. या विषयाचं आणखी भलं होऊ शकलं असतं असं वाटून जातं.


केवळ इंग्रजी येत नसल्यामुळे लंडन पोलिसांनी घातलेला घोळ.. पत्रिका चोरून आणण्यासाठी चंपकच्या मित्राने केलेला भंपकपणा.. ही असली सोंगं फारच हस्यास्पद आहे. हा सिनेमा लंडनच्या पोलीसांनी पाहिला तर अब्रू नुकसानीचा दावा ठोकतील ते असं वाटण्यासारखी स्थिती आहे. असो. पुन्हा असा की इरफान आणि इतर कलाकारांचा अभिनय पाहायाच असेल तर जरूर सिनेमा पहा.


पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार्स. केवळ अभिनयाने तारलेला हा चित्रपट आहे. याची पटकथा आणखी वास्तवाजवळ जाणारी आणि गांभीर्याने गंमत घडवणारी असती तर माहोल आणखी भारी झाला असता.