Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण अद्याप दोघांनीही त्यांच्या लग्नबद्दल किंवा रिलेशनसंदर्भात भाष्य केलेलं नाही. आता आज तकला दिलेल्या मुलाखतीत आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी परिणीती चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल भाष्य केलं आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी लग्नाबद्दल माहिती दिली नसली तरी एक हिंट मात्र त्यांनी दिली आहे. परिणीतीसोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल राघव चढ्ढा यांना प्रश्न विचारला असता हसत-हसत ते म्हणाले,"लवकरच तुम्हाला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल". राघव चढ्ढा यांचं हे उत्तर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. राघव चढ्ढा यांच्या या उत्तराने ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
परिणीती-राघव यांचा साखरपुडा होणार? (Parineeti Chopra Raghav Chadha Engagement)
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा तिच्या लेकीसह भारतात आली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियंका भारतात आली असल्याचं म्हटलं गेलं. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिणीती आणि राघवचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण तसं काही झालं नाही आणि 'देसी गर्ल' प्रियंकादेखील पुन्हा परदेशात गेली आहे.
दुसरीकडे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. डिनर डेट आणि विमानतळावरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमानतळावर पापराझीने परिणीतीला राघव चढ्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता तिने उत्तर देण्याचं टाळलं.
परिणीती-राघवला नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण तरीही नेटकरी त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंजाबी गायक हार्डी संधूने एका मुलाखतीत परिणीती आणि राघव यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. तर दुसरीरजे आपचे संजीव आरोडा यांनी ट्वीट करत परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. परदेशात दोघांनी शिक्षण घेतलं आहे. परिणीतीचा 'ऊंचाई' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिचा 'चमकीला' आणि 'कॅप्सूल गील' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
संबंधित बातम्या