'पार्च्ड' चित्रपटाच्या दिग्दर्शिकेला जीवे मारण्याच्या धमक्या
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 08:45 PM (IST)
मुंबई : राधिका आपटेच्या बहुचर्चित 'पार्च्ड' चित्रपटाच्या दिग्दर्शिकेला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती आहे. दिग्दर्शिका लीना यादव यांनी गुजरातमधील 'राबरी' समाजातील व्यक्तींकडून अशा धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. लीना यांचे पती आणि पार्च्ड चित्रपटाचे सहनिर्माते असीम बजाज यांच्या फोनवर काही जण संपर्क साधत आहेत. हा क्रमांक लीना यांचा असल्याचं समजून धमक्या दिल्या जात आहेत. लीना यादव यांनी तीन दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. पार्च्ड या चित्रपटात करण्यात आलेल्या महिलांच्या चित्रणाबद्दल ते समाधानी नसल्याचं धमकावणाऱ्या व्यक्तींनी म्हटलं आहे. यावर यादव यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि गावं काल्पनिक असल्याचा खुलासा केला आहे. मात्र मुख्य भूमिका साकारणाऱ्या तनिष्ठा चॅटर्जीची वेशभूषा आपल्या गावातील महिलांसारखी असल्याचा प्रतिवाद समोरुन केला जातो. 'आम्ही काय करु शकतो, याची तुम्हाला कल्पना नाही.' असंही धमकी देणाऱ्या व्यक्तींनी म्हटलं आहे. लीना आणि असीम यांना येणारे फोन आणि व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या क्रमांकावरुन येणारे आहेत. राधिका आपटे, तनिष्ठा चॅटर्जी यांची मुख्य भूमिका असणारा पार्च्ड हा चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. मात्र त्यापूर्वीच तो ऑनलाईन लीकही झाला होता.