मुंबई : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा 'मोहेंजोदरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. पण गोवारीकर पुन्हा एकदा पीरियड फिल्मवर हात आजमावणार आहेत. आशुतोष गोवारीकर आता पानिपतमधील मराठ्यांच्या अजरामर लढाईवर सिनेमा बनवणार आहेत.


गोवारीकर यांनी 'पानिपत-द ग्रेट बेट्रेयल' या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून त्याचा फर्स्ट लूकही जारी केला आहे. पोस्टर शेअर करताना आशुतोष यांनी लिहिलं आहे की, "इतिहासाच्या कथा कायमच मला आकर्षित कतात. यावेळी ही कहाणी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबाबत आहे. हे पाहा पहिलं पोस्टर."


पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जबरदस्त अॅक्शन असलेल्या ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 2018 च्या मध्यापासून सुरुवात होईल. तर 6 डिसेंबर 2019 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अर्जुन कपूर आणि संजय दत्त एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिनेमात अर्जुन मराठा योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्तचीही महत्त्वाची भूमिका आहे.