Pankaj Jha Criticizing Pankaj Tripathi :  ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'पंचायत' या हिट वेब सीरिजमध्ये आमदार चंद्र किशोर ही भूमिका साकारणाऱ्या पंकज झा (Pankaj Jha) यांनी अभिनेता पंकज त्रिपाठीवर (Pankaj Tripathi) अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. काहीजणांनी आपल्या स्ट्रगलचा अधिकच गवगवा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील सुलतानच्या भूमिकेसाठी आपण पहिली पसंती होतो. पण, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी माझ्याऐवजी पंकज त्रिपाठीला घेतले असल्याचा दावाही अभिनेता पंकज झा यांनी केला आहे. 


अभिनेता पंकज झा हे मागील दोन दशकांपासून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये त्यांनी काम केले. नुकतंच त्यांनी 'लल्लनटॉप सिनेमा'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी स्ट्र्गलबाबत भाष्य केले. स्ट्रगल हा शब्द मला मुळीच पसंत नाही असेही त्यांनी सांगितले. 


पंकज त्रिपाठींवर साधला अप्रत्यक्ष निशाणा 


स्ट्रगलच्या मुद्यावर पंकज झा यांनी अप्रत्यक्षपणे पंकज त्रिपाठींवर निशाणा साधला. पंकज झा याने म्हटले की, म्हणाले, मला स्ट्रगल हा शब्द आवडत नाही. जर, तुम्ही तुमचे पॅशन फॉलो करायचे ठरवले तर या प्रवासाचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे. पण, आपल्या सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेकजण स्ट्रगलला ग्लॅमराइज करतात. काहीजण सांगतात आम्ही भाजी विकली, एका छोट्या घरात राहिलो. काहीजण सांगतात, आम्ही दुसऱ्या अभिनेत्याची चप्पल चोरली. पण मला वाटतं की आपल्यावर येणारी प्रत्येक स्थिती ही काहीतरी शिकवणारी असते. 


पंकज त्रिपाठीने चोरली होती मनोज वाजपेयींची चप्पल


अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी एकदा एका शोमध्ये आपल्या जु्न्या स्ट्रगलच्या दिवसांबाबत सांगितले होते. पंकज त्रिपाठींनी सांगितले होते की, मी एका हॉटेलमध्ये काम करत होतो. त्यावेळी मनोज वाजपेयी तिथे राहण्यासाठी आले होते. त्यावेळी मनोज वाजपेयी हे  आपल्या रुममध्ये चप्पल विसरून गेले होते. त्यावेळी ती चप्पल मी घेतली असल्याचे  पंकज त्रिपाठीने सांगितले होते. पंकज झा याने आपल्या मुलाखतीत कोणाचे नाव नाही घेतले. पण,  घटनेचा उल्लेख करून पंकज त्रिपाठीवर निशाणा साधला असल्याची चर्चा आहे. 


 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून कसा पत्ता कट झाला?


पंकज झा यांनी सांगितले की, मी गँग्स ऑफ वासेपूर चित्रपट करणार होतो. त्याच वेळी मला मुकेश छाब्रा यांचा फोन आला. मी पाटणामध्ये होतो त्यामुळे काही दिवसात शूटिंगला परतणार होतो. मला जी भूमिका साकारायची होती, ती करण्यासाठी त्यांनी इतर कलाकाराला बोलावले. ती भूमिका 'सुल्तान'ची होती. माझा रोल गेल्याने मी त्याचे कारण विचारले. पण, मला कोणतेही कारण दिले नाही आणि प्रोडक्शन हाऊसकडून  पु्न्हा फोन आला नसल्याचे त्यांनी सांगितले.