मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आलं असून, त्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.


पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्याशिवाय त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीकाही झाली होती.

तसेच निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांची आडमुठी भूमिकाही कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सिनेक्षेत्रातूनही त्यांच्यावर वारंवार टीका सुरु होती.

विशेष म्हणजे, त्यांना केरळ हायकोर्टाच्या अवमान प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. हायकोर्टाने निहलानी यांना 'का बॉडीस्केप्स' सिनेमासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितलं होतं. पण बोर्डाच्या सदस्यांनी 4 वेळा हा सिनेमा पाहूनही यावर निर्णय घेतला नसल्यानं, कोर्टानं त्यांना अवमान नोटीस बजावली होती.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलाज निहलानी यांची हकालपट्टी निश्चित होती. त्यांच्या जागी निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा आणि 'चाणक्य' मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश यांच्या नियुक्तीची चर्चा होती. पण या दोन्ही नावांना बाजूला करत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसून जोशी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

कोण आहेत प्रसून जोशी ?

  • प्रसून जोशी हे बॉलिवूडमध्ये कवी, लेखक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील आघाडीच्या गीतकारांमध्ये त्यांची गणना होते.  त्यांना आत्तापर्यंत तीनवेळा त्यांना फिल्मफेअर, दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये गीत लेखनासह संगीत दिग्दर्शनही केलं आहे.

  • दिल्ली-6, तारे जमीन पर, रंग दे बसंती, हम तुम, फना या सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं आहे. तर लज्जा, आंखे, क्योंकि या सिनेमासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केलं आहे.

  • 'तारे जमीन पर' या सिनेमातील 'माँ' या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यातही आलं. तसेच 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • 'फना' सिनेमातील 'चाँद सिफारीश' आणि 'भाग मिल्खा भाग' सिनेमातील 'जिंदा' या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.