OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ott Platform) लवकरच तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स प्रदर्शित करणे बंधनकारक केले जाऊ शकते. जसे चित्रपटगृहांमध्ये आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स दाखवण्यात येतात, तसेच डिस्क्लेमर्स आता ओटीटीवर देखील दाखवण्यात येतील, असं म्हटलं जात आहे. याबाबत आरोग्य मंत्रालय (Health Ministry) संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी गुरुवारी (25 मे) पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आरोग्य मंत्रालय हे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने नियम 2004 मध्ये, सुधारणा करण्यावर सक्रियपणे विचार करत आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.
तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दर्शविणाऱ्या ऑनलाइन कंटेन्टच्या प्रकाशकांना त्या कंटेन्टच्या सुरुवातीला आणि मध्ये किमान 30 सेकंद तंबाखूविरोधी डिस्क्लेमर्स दाखवावे लागू शकतात, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे.
चित्रपटांमध्ये (Movie) तंबाखू उत्पादने किंवा त्यांचा वापर दाखवण्यात येत असताना स्क्रीनच्या खाली संदेश म्हणून त्यांना तंबाखूविरोधी डिस्क्लेमर दाखवला जातो. ऑडिओ-व्हिज्युअल डिस्क्लेमर चित्रपटाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी दाखवावा लागतो, ज्यामध्ये तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दर्शविले जातात.
तंबाखूजन्य पदार्थांचा वापर आणि धूम्रपान हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ott Platforms ) प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये डिस्क्लेमर शिवाय मोठ्या प्रमाणावर दाखवले जाते. त्यामुळे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 चे स्पष्ट उल्लंघन होते.
चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये अनेक सिन्समध्ये कलाकार हे व्यसन करताना दिसतात. अनेक वेळा या कलाकरांना पाहून प्रेक्षक प्रेरित होत असतात. अनेक वेळा चित्रपट आणि वेब सीरिज तरुण मुलं आणि मुली देखील बघत असतात. ओटीटीवरील कंटेन्टमधील आपल्या आवडत्या कलाकाराला व्यसन करताना पाहून अनेक वेळा मुलं आणि मुलींना देखील व्यसन करण्याची इच्छा होते.
ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना मिळते प्रेक्षकांची पसंती
ओटीटीवर (OTT) विविध विषयांवर आधारित चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित केल्या जातात. कोरोनानंतर ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये इतकी आवड निर्माण झाली आहे की, आता चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी दिसत आहे. बॉलिवूडमधील स्टार्सही ओटीटीवर डेब्यू करत आहेत. ओटीटीवर वेब सीरिज आणि चित्रपट लोक घरबसल्या पाहू शकतात. ओटीटीवर अनेक शॉर्ट फिल्म्स देखील प्रेक्षक पाहू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या: