उस्मानाबादमधील तेरच्या यात्रेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2 चा शो दाखवला जात आहे. एकीकडे हजारो रुपयांना बाहुबलीचं तिकीट विकलं जात असताना अवघ्या 50 रुपयांमध्ये न्यू कोहिनूर टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2 पाहायला मिळत आहे.
अंडरटेकरची भेट, ते मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स !
देशभरात बाहुबलीला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. बाहुबली पाहून आलेले सर्वच प्रेक्षक 'पैसा वसूल' झाल्याची प्रतिक्रिया देत आहेत. बाहुबली 2 चं पहिल्या दिवसाचं बुकिंग सगळीकडे हाऊसफुल्ल होतं. अनेक थिएटर्समध्ये पंधराशे रुपयांपेक्षा जास्त दरानं तिकीट विक्री झाली.
'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
दक्षिण भारतात तर 4000 रुपयांपेक्षा जास्त दरानं तिकीट विक्री झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन तिकीट बुकिंग ऐवजी चाहत्यांनी प्रत्यक्ष जाऊन 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लावल्याचं चित्र होतं.
महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा सर्वच शहरात या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
नाशिकमध्ये बाहुबली टी शर्ट
बाहुबली पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये बाहुबलीच्या चाहत्यांनी बाहुबलीचे शर्ट घालून सिनेमागृहात हजेरी लावली.
चंद्रपुरात जल्लोष
राज्याच्या कानाकोपऱ्यात बाहुबलीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपुरातही चाहत्यांनी ढोल ताशाच्या गजरात बाहुबली-2चं स्वागत केलं.
पिंपरीत रांगा
पिंपरी-चिंचवडमध्येही बाहुबली-2 पाहण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. लहान थोरांसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांमध्ये बाहुबली पाहण्याची उत्सुकता दिसली.
हैदराबादेत प्रभासच्या पोस्टरला दुग्धाभिषेक
हैद्राबादमध्ये बाहुबली सिनेमाच्या चाहत्यांनी बाहुबली-2 अनोखं स्वागत केलं.. बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभासच्या पोस्टरला चाहत्यांनी चक्क दुग्धाभिषेक घातला. प्रभासच्या पोस्टरला मोठा हार घालत, बाहुबली-2चं जंगी स्वागत केलं.
‘बाहुबली : द बिगिनिंग’ 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.
बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.