मुंबईः अरविंद अडीगाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय कादंबरीवर आधारित नेटफ्लिक्सच्या 'द व्हाईट टायगर'ने अडॉप्टेड स्क्रीनप्ले प्रकारातील 93व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम यादीमध्ये स्थान मिळवले आहे. प्रियंका चोप्राने या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. सोबतचं ती या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक आहे.
'द व्हाइट टायगर'ला ऑस्करच्या अंतिम यादीत नामांकन मिळाल्याबद्दल प्रियंका चोप्राने लिहलंय की, "नुकताच आम्हाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे! रामिन आणि टीम व्हाईट टायगरचे अभिनंदन. मी स्वतःहून नॉमिनेशनची घोषणा करत असल्याने हे अधिक खास बनले आहे. मला खूप अभिमान वाटतो."
रामिन बहरानी यांनी लेखक अरविंद अडीगा यांचं पुस्तक केवळ चित्रपटासाठी अडॉप्ट केलं नाही तर त्यांनी स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं आहे.
अभिनेता आदर्श गौरवला ब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी 'द व्हाइट टायगर' मधील उत्तम अभिनयासाठी नामांकन मिळाले होते.
रामिन बहरानी लिखित आणि दिग्दर्शित ‘द व्हाईट टायगर’ची कथा गरीब ड्राइव्हर बलराम हलवाई (आदर्श गौरव) याच्या संघर्ष आणि महत्वाकांक्षेभोवती फिरते. चित्रपटात राजकुमार राव आणि प्रियंका चोप्रा यांनी आदर्श गौरवच्या मालक-मालकिनीची भूमिका केली आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे 25 एप्रिल रोजी भव्य समारंभात 93 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा केली जाईल.