मल्याळी भाषेतील 'जल्लीकट्टू' चित्रपटाची 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. ऑस्कर प्रवेशासाठी एकूण 27 चित्रपट शर्यतीत होते, यात 4 हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे.


जल्लीकट्टू चित्रपट 6 सप्टेंबर 2019 ला टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये दाखवण्यात आला होता. या महोत्सवात या चित्रपटाचे चांगले कौतुक झाले होते. 24 व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ए विंडो ऑन एशियन सिनेमा' या विभागांतर्गत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. केरळमध्ये 4 ऑक्टोबर 2019 ला हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. लिजो जोस पेलीसेरी यांना भारताच्या 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. तर 9 फेब्रुवारी 2020 रोजी 7व्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार जिंकले आहेत.


यामध्ये शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोसले, गुलाबो सीताभो, सीरियस मॅन, बुलबुल, कमल, द पिंक स्काई या हिंदी चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय बिटरस्वीट आणि डिसिपल हे मराठी चित्रपटही या शर्यतीत होते. याआधी मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान यांना परदेशी भाषेच्या चित्रपट प्रकारात नामांकन मिळालं. हे सर्व चित्रपट पुरस्कार जिंकण्यात अयशस्वी ठरले.