न्यूयॉर्क : अख्ख्या जगाला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन चक्क आपल्या बॉलिवुडच्या प्रेमात होता. कुमार सानू, उदित नारायण, अल्का याज्ञिक यासारखी नव्वदच्या दशकातील गायक मंडळी ओसामाची फेव्हरेट असल्याचं समोर आलं आहे.


दिलजल्यांचा तारणहार कुमार सानू ओसामाला प्रचंड आवडायचा. उडत्या चालींची गाणी गाणारा उदित नारायणही ओसामाला भुरळ घालायचा. फक्त गायकच नाही, तर गायिकांच्याही प्रेमात ओसामा पडला होता. अलका याज्ञिक तर ओसामाची मोस्ट फेव्हरेट.

2011 साली अबोटाबादमधल्या ओसामाच्या घरात केलेल्या ऑपरेशन जेरोनिमोमध्ये सील कमांडोजनी त्याचा खात्मा केला. त्यावेळी त्याच्या घरातला कम्पुटरही जप्त करण्यात आला. त्यातील तब्बल 4 लाख 70 हजार फाईल्स सीआयएनं रिट्राईव्ह केल्या आहेत.

आत्मघातकी स्फोटांची प्रात्यक्षिकं, सामूहिक हत्या, नाईन-ईलेव्हनच्या कटाच्या अनेक फाईल्स, आयसिससोबतचे मतभेद, काश्मीरसंदर्भातल्या बातम्या... अशा अनेक फाईल्स या कम्प्युटरमध्ये दडल्या होत्या.

त्यातल्या काही फाईल्स सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेऊन, बाकीच्या सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. त्यात ही माहिती समोर आली आहे.

ओसामाच्या या कम्प्युटरमध्ये नर्सरीतली बडबड गीतंही होती. शिवाय ओसामाला टॉम अँड जेरीचे कार्टून्सही आवडायचे. त्याच्या या कम्प्युटरमध्ये अँट्स आणि कार्स ही अॅनिमेटेड फिल्मही होती.

या कम्प्युटरमधून ओसमाला स्पोर्ट्सचंही वेड असल्याचं समोर आलं आहे. फिफा वर्ल्डकपमधले बेस्ट गोलही त्यानं या कम्प्युटरमध्ये सेव्ह करुन ठेवले होते.

ब्राझिलचा गारिन्चा, कॅमरूनचा रॉजर मिला, स्पेनचा फर्नांडो टोरेस हे त्याचे आवडते खेळाडू. त्यांनी केलेले भन्नाट गोल्स ओसामानं आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करुन ठेवले होते.

ओसामा किती क्रूर होता, हे अख्ख्या जगानं पाहिलं. पण त्याची नजर भारतावरही होती. कारण त्याच्या कम्प्युटरमध्ये दिल्लीतल्या 2010 च्या हॉकी वर्ल्डकपच्या सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांच्या फाईल्सही त्याच्याकडे होत्या. शिवाय स्टोरी ऑफ इंडियाची अख्खी सीरिज त्याच्याकडे होती. पण भारताकडे त्याची वाकडी नजर वळण्याआधीच त्याचा खात्मा झाला.