मुंबई : 'मीटू' प्रकरणात अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकरांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असलेला अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात दाखल केला आहे. नाना पाटेकरांना क्लीन चिट मिळाल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताचा मात्र तीळपापड झाला आहे.

ओशिवरा पोलिसांनी काल अंधेरी कोर्टात बी समरी रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये तनुश्रीने केलेल्या आरोपांविषयी कोणताही ठोस पुरावा मिळत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. इतकंच नाही, तर नाना निर्दोष ठरण्याची शक्यता आहे.

'फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांचा छळ करण्यासाठी कुप्रसिद्ध असतानाही या भ्रष्टाचारी यंत्रणेने, त्यांच्यापेक्षाही भ्रष्ट असलेल्या नाना पाटेकरला क्लीन चिट दिली आहे' अशा शब्दात तनुश्रीने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातल्या साक्षीदारांवर दबाव टाकून त्यांचा आवाज दाबण्यात आला, बनावट साक्षीदार उभे करण्यात आले असाही आरोप तनुश्रीने केला आहे.

VIDEO | कथित विनयभंग प्रकरणी नाना पाटेकरांना मोठा दिलासा, पुरावे नसल्याचा पोलिसांचा कोर्टात रिपोर्ट



'माझ्या सर्व साक्षीदारांची बाजू ऐकून घेण्यापूर्वीच अहवाल सादर करण्याची घाई पोलिसांना का होती? खरं तर मला याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. ज्या देशात आलोकनाथसारख्या बलात्काऱ्यांना क्लीन चिट मिळून त्यांचं इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन होतं. तर विनयभंगाचा आरोपी असलेल्या नाना पाटेकरला क्लीन चिट विकत घेऊन इंडस्ट्रीतल्या अनेक महिलांना छळण्याची संधी मिळू शकते, त्यात नवल ते काय?' असा सवालही तनुश्रीने उपस्थित केला आहे.

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांबदद्ल पोलिसांनी 15 जणांचे जबाब नोंदवून घेतले, पण त्यापैकी एकानेही दशकभरापूर्वी झालेल्या या कथित लैंगिक छळाला दुजोरा दिला नसल्याची माहिती आहे. अभिनेत्री डेझी शाहचीही या 15 जणांमध्ये चौकशी झाली होती. मात्र तनुश्रीने वर्णन केलेल्या घटनेशी साधर्म्य साधणारा जबाब कोणीही नोंदवला नाही.

काय आहे प्रकरण?


'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर 2008 साली अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला होता.

'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला होता. तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री म्हणाली होती.

तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

डेझी शाह 'त्या' दिवशी सेटवर

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 2008 साली त्या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळी डेझीदेखील सेटवर उपस्थित होती. तनुश्रीने नानांवर आरोप केल्यांनातर डेझीने माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी डेझीला पोलिस ठाण्यात बोलावलं होतं.

काय म्हणाली होती डेझी?

'तेव्हा मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करत होते. मी तनुश्रीला काही डान्स स्टेप्स शिकवत होते. सुरुवातीचे दोन दिवस सर्व काही सुरळीत सुरु होते. परंतु तिसऱ्या दिवशी अचानक काहीतरी झाले. तनुश्री खूप धक्क्यात असल्याचं आम्ही सर्वांनी पाहिलं. नेमकं काय झालं होतं, हे मला माहीत नाही, परंतु मी तनुश्रीच्या सोबत आहे.' असं डेझी म्हणाली होती.

कोण आहे तनुश्री दत्ता?

2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे.

नाना पाटेकरांची बाजू काय?


दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं.

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर उत्तर देणं नाना पाटेकर यांनी टाळलं होतं. जे खोटं आहे, ते खोटं आहे, असं म्हणत मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचं नाना पाटेकर म्हणाले. तर तनुश्री दत्ताच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही, असं दिग्दर्शक राकेश सारंग यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असंही तनुश्री म्हणाली होती.
संबंधित बातम्या

तनुश्रीच्या तक्रारीनंतर नाना, सारंग, आचार्य, सिद्दीकींवर गुन्हा

मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर 

तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग  

राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता

तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया

तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला

बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल