Nitin Desai: कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई (ND Studio) यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.. अनेक कलाकारांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तसेच बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अक्षय कुमारचं ट्वीट
अक्षय कुमारनं ट्वीट शेअर करुन नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांने ट्वीटमध्ये लिहिलं, 'नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. ते प्रॉडक्शन डिझाईनमधील दिग्गज होते. आमच्या चित्रपटसृष्टीचे ते एक मोठा भाग होते. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नितीन देसाई यांच्या आदरार्थ, आम्ही आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करत नाही आहोत. ट्रेलर उद्या सकाळी 11 वाजता लॉन्च होईल. ओम शांती.'
संजय दत्तनं देखील ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. त्यानं लिहिलं, 'नितीन देसाई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. एक एक चांगला मित्र आणि उत्तम कला दिग्दर्शक ते होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.'
मधुर भांडारकरनं नितीन देसाई यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करुन ट्वीटमध्ये लिहिलं, 'नुकतीच राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकली. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्यासोबत चार उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम करण्याचा बहुमान मिळाला. त्यांच्या बहिर्मुख व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यासोबत केलेला प्रत्येक प्रोजेक्ट अविस्मरणीय ठरला. भारतीय चित्रपटसृष्टीने एक खरा रत्न गमावला आहे. आम्हाला तुमची आठवण येईल दादा.'
आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, 'लगानसारख्या आमच्या अनेक प्रोजेक्टला आकार देणारे नितीन चंद्रकांत देसाई हे आता आमच्यात नाहीत, हे सत्य स्वीकारायला थोडा वेळ लागेल. आम्हाला तुमची आणि तुमच्या अतुलनीय कलेची आठवण येईल.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: