Nishi Singh Passed Away : मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'कुबूल है', 'तेनाली राज', 'इश्कबाज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निशी सिंह आजारी होत्या. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून निशी यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वीच निशी यांनी त्यांचा 50 वां वाढदिवस साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. निशी सिंह यांचे पती संजय सिंहदेखील मनोरंजनक्षेत्रात काम करतात. अभिनयासोबत ते लेखनदेखील करतात.
निशी सिंह यांच्या निधनाची माहिती देत पती संजय सिंह म्हणाले की,"निशी सिंह यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी निशी यांची तब्येत पुन्हा बिघडली.
निशी सिंह गेल्या आठ वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. मालिकांसोबत त्यांनी अनेक सिनेमांतदेखील काम केलं आहे. 'कुबूल है' या मालिकेत निशी सिंह हसिना बीवीच्या भूमिकेत दिसून आल्या आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, लेखक-अभिनेते संजय सिंह भाडली आणि दोन मुलं असा परिवार आहे.
संजय सिंह यांनी पत्नी निशीची शेवटची इच्छाही पूर्ण केली आहे. घशाच्या संसर्गामुळे त्या काही दिवसांपासून अन्नात फक्त द्रव घेत होत्या. त्यामुळे निशी यांनी वाढदिवसादिवशी तिचा आवडता बेसन लाडूही खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिने बेसन लाडू खाल्लाही.
मान्सून वेडिंग या सिनेमात निशी यांनी काम केले होते. त्यानंतर कमल हसन आणि मामूटीचा चित्रपट केला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.
संबंधित बातम्या