मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आई बनणार आहे. नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदीने आपल्या पहिल्या बाळाबद्दलची गोड बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे. अंगद बेदीने शुक्रवारी रात्री गर्भवती नेहा धुपियासोबतचे काही फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

"होय, ही अफवा खरी आहे, आम्ही तिघे...सतनाम वाहे गुरु", असं कॅप्शन अंगदने फोटो शेअर करताना दिलं आहे.


तर "नवी सुरुवात होत आहे, आम्ही तिघे...सतनाम वाहे गुरु" या कॅप्शनसह नेहाने देखील ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.


37 वर्षीय नेहा धुपियाने याच वर्षी 10 मे रोजी दिल्लीतील गुरुद्वारात आपल्या काही नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत 35 वर्षीय अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न गेलं होतं. प्रेग्नंट असल्याने नेहा आणि अंगदने गडबडीत लग्न केल्याची चर्चा रंगली होती. मात्र कधी त्यांनी हे वृत्त फेटाळलं तर कधी दोघांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं.

लग्नानंतर नेहाच्या कपड्यांवर लक्ष दिलं तर ती कायम सैल कपड्यांमध्येच दिसत होती, जेणेकरुन ती गर्भवती असल्याचं कळू नये. अखेर लग्नाच्या तीन महिन्यानंतर दोघांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावरुन दिली. यानंतर युझर्सनी दोघांवर  शुभेच्छांचा वर्षाव केला.