Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. त्याच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. सध्या नवाजुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सध्या मुंबईमधील त्याचं आलिशान घर सोडून एका हॉटेलमध्ये राहतोय अशी चर्चा आहे. नवाजुद्दीनने हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेण्याचं कारण हे त्याच्या कुटुंबामधील होणारे वाद आहे, असं म्हटलं जातंय.
नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. आलियानं नवाजुद्दीन आणि त्याच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता नवाजुद्दीननं घर सोडून हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुन्निसा आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या आईने आलियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आलियाने नवाज आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला आहे. आई आणि आलिया यांच्यामधील वाद जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत नवाज हा हॉटेलमध्ये राहणार आहे, असं म्हटलं जात आहे. आलिया आणि नवाजुद्दीनचा 2009 मध्ये विवाह सोहळा पार पडला. पण गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि नवाजुद्दीनच्या आईमध्ये मतभेद होत आहेत.
गेल्या वर्षी नवाजुद्दीननं मुंबईत घेतलं घर
गेल्या वर्षी नवाजुद्दीननं मुबंईमधील अंधेरी येथे आलिशान घर घेतलं. नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं. या घराचे फोटो नवाजुद्दीनने सोशल मीडियावर शेअर केले होते.
नवाजुद्दीनचे चित्रपट
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीन हा लवकरच 'हड्डी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील नवाजुद्दीनचा लूक काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या चित्रपटामधील नवाजुद्दीनचा लूक पाहून चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.