Nawazuddin Siddiqui Brother Arrested : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडमधील अतिशय टॅलेंटेड अभिनेता समजला जातो. त्याने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयासोबत नवाजुद्दीन वेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. आता, नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या भावामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. 


नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अयाजुद्दीनला अटक


'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, 22 मे रोजी नवाजुद्दीनच्या भावाला बुधना पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून ताब्यात घेतले होते. बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाने जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाच्यावतीने बेकायदेशीरपणे  आदेश पत्र जारी केल्याचा आरोप आहे.


जावेद इक्बाल नावाच्या व्यक्तीसोबत शेतजमिनीच्या वादातून हे कृत्य करण्यात आले. जारी केलेला आदेश हा बनावट असल्याचे समोर आल्यानंतर  जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. नवाजुद्दीनचा भाऊ अयाजुद्दीनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ यापूर्वीही अडचणीत 


नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये अयाजुद्दीन सिद्दीकीवर सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह फोटो शेअर करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला होता. याबाबत अयाजुद्दीनने एएनआयला सांगितले होते की, "एका व्यक्तीने भगवान शिवाचे अपमानास्पद फोटो पोस्ट केले होते, मी त्याच्याशी याबद्दल बोललो आणि लिहिले की तुम्ही अशा पोस्ट शेअर करू नका ज्यामुळे एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावतील. मात्र, माझ्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


नवाजुद्दीन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत 


नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या खासगी कारणांनी चर्चेत असतो. काही काळापूर्वी तो पत्नी आलिया सिद्दीकीपासून वेगळे होण्याच्या निर्णयाने आला होता. मे 2020 मध्ये, आलियाने नवाजुद्दीनला  व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. वैवाहिक जीवनात जवळपास 10 वर्षांपासून तणाव असल्याचे तिने म्हटले.  आलियाने नवाजुद्दीनचा भाऊ शमास याच्यावरही हिंसाचाराचे आरोप केले होते.


आलियाने पती नवाजसोबत समेट केला


मात्र, अलीकडेच आलियाने घटस्फोटाची नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेत नवाजुद्दीनसोबत समेट करण्याचा निर्णय घेतला. ई टाइम्सशी बोलताना आलिया म्हणाली, “अलीकडच्या काळात माझ्या आयुष्यात काही गोष्टी बदलल्या आहेत. मला वाटले की जेव्हा आपण वाईट गोष्टी जगासोबत शेअर करतो तेव्हा चांगल्या गोष्टीही शेअर केल्या पाहिजेत. मला वाटतं जे चांगलं आहे तेही पाहिलं पाहिजे. नवाजही इथेच होता त्यामुळे आम्ही मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.


आलिया म्हणाली, “मला वाटते की आमच्या नात्यात आलेल्या समस्या नेहमी कोणत्यातरी तिसऱ्या व्यक्तीमुळे होत्या. पण आता तो गैरसमज आपल्या आयुष्यातून दूर झाला आहे. आपल्या मुलांसाठी आपण पूर्णपणे आत्मसमर्पण केले असून आता आयुष्यात वेगळे राहण्याचा पर्याय नाही असेही तिने म्हटले.