घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेकांना आपल्यासाठी झटणाऱ्या महिलांना मानाचा मुजरा करायचा असतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा व्यग्र असतो. पण या महिला आपल्या कामाचा भाग म्हणून अनेकांचा जीव वाचवत असतात. सध्या कोरोना काळात डॉक्टर यांनाही अशानेच दैवत्व मिळालं आहे. गेल्या सात महिन्यांपासून अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टारांना तेजस्विनीने मानाचा मुजरा केला आहे.
तेजस्विनी पंडित हे नाव मराठी सिनेसृष्टीत आता सर्वश्रुत झालं आहे. आपल्या अभिनयाने तिने आपलं असं वेगळं स्थान पटकावलं आहे. मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. मालिकाविश्वही तिने गाजवलं आहे. तेजस्विनी सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. विशेषत: नवरात्रीच्या या मुहूर्तावर ती दरवेळी फोटोशूट करते. पण हे फोटोशूट नेहमी सामाजिक भान जपणारं असतं. गेल्या वर्षी तिने नऊ रुपातल्या देवी साकारल्या होत्या. यंदा फोटोशूट करताना तिने वेगळी थीम घेतली आहे.
ड्रग्ज प्रकरण भोवणार? कुली नंबर 1चा 'सारा' खेळ खल्लास!
गेल्या सात महिन्यांपासून असलेला कोरोना लक्षात घेऊन तिने यंदाचं फोटो शूट केल्याचं कळतं. या फोटोत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी एका रुग्णाची सेवा करत असून त्याचा जीव वाचवत आहेत, तर त्या डॉक्टरच्या रुपात तेजस्विनीने देवी साकारली आहे. डॉक्टरच्या रुपातली देवी साकारतानाच तिने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना, वैद्यकीय सुविधा देणाऱ्या लोकांना.. डॉक्टरांना वंदन केलं आहे. आणि त्यांच्या रुपाने देवीच आपल्यासमोर उभी असल्याचा मेसेज इतर समाजाला दिला आहे.
तेजस्विनीची ही थीम चांगलीच व्हायरल होते आहे. पहिल्या फोटोला मिळणारा प्रतिसाद पाहता आता पुढचे आठ दिवस तेजस्विनी कोणत्या वेगवेगळ्या रुपात देवी साकारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.