Nana Patekar Laal Batti Web Series : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आता ओटीटीवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आगामी 'लाल बत्ती' (Laal Batti) या वेबसीरिजमध्ये ते झळकणार आहेत. जियो स्टुडिओजच्या कंटेट स्लेटच्या एका भागात या सीरिजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
जियो स्टुडिओजच्या वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत 'कंटेट स्लेट' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्या 'लाल बत्ती' या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली. सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे.
ओटीटीवर कमबॅक करण्यास नाना पाटेकर सज्ज (Nana Patekar On OTT)
'लाल बत्ती' ही वेबसीरिज हिंदी, मराठी, बांगला, गुजराती, भोजपुरीसह जवळपास 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून नाना पाटेकर ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. या सीरिजमध्ये नाना एका वकिलाच्या भूमिकेत दिसू शकतात. तर मेघना मलिक या सीरिजमध्ये नानांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
नानांना ओटीटीवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. या सीरिजच्या माध्यमातून प्रकाश झा यांच्यासोबत नाना दुसऱ्यांचा काम करत आहेत. याआधी 'राजनीती' या सिनेमात दोघांनी काम केलं होतं. नाना मनोरंजनसृष्टीत काम करण्यासोबत सामाजिक कार्यातही तेवढेच अॅक्टिव्ह आहेत.
'या' कारणाने नाना मनोरंजनसृष्टीपासून दूर होतो
अनेक चांगल्या कलाकृतींचा नाना पाटेकर भाग आहेत. पण 2018 साली तनुश्री दत्ताने नानांवर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा 'तडका' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात तापसी पन्नू, श्रिया सरन महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमादेखील झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. तसेच 2020 साली त्यांचा 'इट्स माय लाइफ' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता चाहते त्यांच्या 'लाल बत्ती' या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. नाना पाटेकर अभिनेते असण्यासोबत लेखक आणि निर्मातेदेखील आहेत.
संबंधित बातम्या