लायकी नसलेल्यांना महत्त्व नको, सलमानला नानांचे फटके
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 09:46 PM (IST)
पुणे : उरी हल्ल्यानंतर सर्व स्तरातून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर पाक कलाकारांची पाठराखण करणारा बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला नाना पाटेकरांनीही शाल-जोडीतले हाणले आहेत. आपले खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. त्यामुळे लायकी नसलेल्यांना उगाच महत्त्व देऊ नका, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी नाव न घेता सलमान खानला टोला हाणला. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'सगळ्यात आधी देश, त्यानंतर आम्ही कलाकार, कलाकारांची किंमत देशासमोर शून्य असते. ज्यांची लायकी नाही त्यांना महत्व देऊ नका, खरे हिरो आपले जवान आहेत, आम्ही नकली लोक आहोत, आम्हाला इतकं महत्त्व देऊ नका' अशी विनंतीही नानांनी केली. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार गमावू नका, प्रत्येक गोष्ट भांडून का घ्यावी लागते, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शेतकरी संघटित नाही त्यामुळे आत्महत्या होत आहेत, मुसलमान वर्गाला पुढं आणलं पाहिजे, कारण तेही भारतीय आहेत, असं आवाहनही नाना पाटेकर यांनी केलं.