मुंबई : राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि संजय दत्तने भूमिका साकारलेला मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमातील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहेत. याच सिनेमात छोटीशी भूमिका केलेला अभिनेता विशाल ठक्कर गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहे.
विशाल ठक्कर 2015 पासून अचानक गायब झाला आहे. तो सध्या कुठे आहे? काय करतो? याबाबत कोणतीही माहिती त्याच्या कुटुंबियांना नाही. गेल्या तीन वर्षात त्याने कुणाला संपर्कही केलेला नाही. विशाल कुठे आहे याचा शोध घेतला जात आहे.
31 डिसेंबर 2015 रोजी विशाल आपल्या आईकडून 500 रुपये घेऊन घरातून गेला होता. मी सिनेमा पाहायला जात असल्याचं विशालने त्यावेळी आईला सांगितलं होतं. सिनेमा पाहायला येण्याबाबत आईलाही विशालने विचारलं होतं, मात्र त्या गेल्या नाही. त्याच रात्री त्याने वडिलांना फोन करुन आपण पार्टीला जात असून दुसऱ्या दिवशी येणार असल्याचंही कळवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विशालने नवीन वर्षाचा मेसेजही फेसबुकवर पोस्ट केला होता.
मात्र त्या दिवसापासून त्याचा फोन बंद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार विशाल 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी शेवटचा आपल्या प्रेयसीसोबत मुंबईत दिसला होता. विशालला भेटून मी शूटसाठी निघून गेल्याचं त्याच्या प्रेयसीनं सांगितलं.
बेपत्ता होण्यापूर्वी विशाल आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मोठा वाद झाला होता. प्रेयसीने विशालवर बलात्कार आणि अत्याचाराचे आरोप लावले होते. मात्र नंतर प्रेयसीने तिची तक्रार मागे घेतली होती. विशालने 2005 मधील टँगो चार्ली आणि तारक मेहता का उलटा चश्मा कार्यक्रमातही काम केलं आहे.