Munjya Box Office Collection Day 17: आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मु्ख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'चा (Munjya) बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशीदेखील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्येही 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी या 'मुंज्या'ने चांगलीच कमाई केली आहे.
'मुंज्या'ने 17 व्या दिवशी किती कमाई केली?
'मुंज्या'मध्ये ना मोठी स्टारकास्ट आहे ना तो मोठ्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. पण त्याने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यास यश मिळवले आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच 'मुंज्या'चे बजेट वसूल झाले असून आता नफा कमावत आहे. 'मुंज्या'रिलीज झाल्यानंतरच्या तिसर्या वीकेंडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 4 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 35.3 कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या आठवड्यात 32.65 कोटींची कमाई केली.
रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी 'मुंज्या'ने 3 कोटींची कमाई केली. रिलीजच्या 16 व्या दिवशी अर्थात शनिवारी 5.5 कोटींची कमाई केली. त्यानंतर 'मुंज्या'च्या रविवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे प्राथमिक आकडे समोर आले आहेत.
'सॅकनिल्क'च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मुंज्या' ने रिलीजच्या 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी 6.75 कोटी रुपये कमवले आहेत.
यासह 17 दिवसांत 'मुंज्या'ने 83.2 कोटींची कमाई केली आहे.
‘मुंज्या’ ने दिली मोठ्या चित्रपटांना मात...
फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ ने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेली ‘बड़े मियां छोटे मिया’ आणि 200 कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणची भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाला मात दिली आहे. ‘बड़े मियां छोटे मिया’ ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली. तर, 'मैदान'ने 52 कोटींची कमाई केली होती.
'मुंज्या'ला 100 कोटी क्लबचे वेध
'मुंज्या' चित्रपटाची निर्मिती 30 कोटी रुपयांच्या आसपास झाली. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात आपल्या बजेटचा आकडा पार केला. चित्रपटाने आता बजेटच्या दुप्पट कमाई करत 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता 'मुंज्या' हा 100 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या क्लबमध्ये सहभागी होईल का, याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.