Munjya Box Office Collection Day 15:  बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या' (Munjya) चित्रपटाचा धुमाकूळ  सुरू आहे. दोन आठवड्यांच्या यशानंतर आता चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री घेतली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले आहे. चित्रपटाने रिलीजच्या 15 व्या दिवशीदेखील चांगली कमाई केली आहे. 


'मुंज्या'ने 15 व्या दिवशी किती कमाई केली?


यंदाच्या वर्षात ज्या मोठ्या चित्रपटांना जमले नाही ते  'मुंज्या'ने करून दाखवले आहे. या चित्रपटात कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही. त्याशिवाय, चित्रपटाचे मोठे बजेट नाही. मात्र, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगले कथानक यामुळे 'मुंज्या'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक आयर्नचा 'चंदू चॅम्पियन' सारखा तगडा चित्रपट असतानादेखील 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आपली कमाई सुरू ठेवली आहे. 






'मुंज्या'ने आपल्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने 35.3 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 32.65 कोटींची कमाई केली. आता चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात झोकात एन्ट्री घेतली आहे. 


'सॅकनिल्क'च्या प्राथमिक अंदाजानुसार 'मुंज्या'ने शुक्रवारी, अर्थात रिलीजच्या 15 व्या दिवशी 2.75 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारच्या कमाईनंतर मुंज्याने 71 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 


'मुंज्या'ला 100 कोटी क्लबचे वेध


'मुंज्या' चित्रपटाची निर्मिती 30 कोटी रुपयांच्या आसपास झाली. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात आपल्या बजेटचा आकडा पार केला. चित्रपटाने आता बजेटच्या दुप्पट कमाई करत 70 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता 'मुंज्या' हा 100 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या क्लबमध्ये सहभागी होईल  का, याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


'मुंज्या'च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण,त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.