मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मंगळवारी (26 डिसेंबर) मुंबईत पार पडलं. या ग्लॅमरस आणि ग्रॅण्ड रिसेप्शनला क्रिकेट, बॉलिवूडसह उद्योग जगतातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

या सोहळ्यात सचिन तेंडुलकर, एम एस धोनीसह अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते. तर महानायक अमिताभ बच्चन, बादशाह शाहरुख खान यांनीही कुटुंबासह हजेरी लावली. या पार्टीत किंग खान शाहरुख खानने चारचांद लावले. कारण या पार्टीत नवविवाहित दाम्पत्याने शाहरुखसोबत त्याच्या काही गाण्यांवर डान्सही केला.

विरुष्का 'दिल से' चित्रपटातील 'छैया-छैया' गाण्यावर किंग खानसोबत थिरकले. शिवाय 'कल हो ना हो' सिनेमातील 'प्रिटी वुमन' गाण्यावर विराट शाहरुखसोबत नाचला. तसंच एका पंजाबी गाण्यावरही विराट आणि अनुष्काने डान्स केला.






इतकंच नाही तर शाहरुखने त्याच्या 'जब तक है जान' या सिनेमातील एका डायलॉगवर विराटला अनुष्कासाठी लिप्सिंकही करायला लावलं. पण शेवटी त्याने डायलॉगमध्ये ट्विस्ट आणल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. विराटच्या डायलॉगनंतर अनुष्काही इम्प्रेस झाली आणि तिने त्याच्या गालावर किस केलं.



विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीच्या सिएन्ना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात लग्न केलं होतं. त्यानंतर 21 डिसेंबरला विरुष्काच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन दिल्लीत पार पडलं होतं.